आता मंत्र्यांना गावबंदी

By Admin | Updated: June 9, 2017 01:05 IST2017-06-09T01:05:19+5:302017-06-09T01:05:35+5:30

सुकाणू समितीचा निर्णय : सोमवारी ठिय्या, मंगळवारी रेल-रास्ता रोको

Now the ministers have sacked villagers | आता मंत्र्यांना गावबंदी

आता मंत्र्यांना गावबंदी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या संपाच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारपासून सर्व मंत्र्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्याबरोबरच शेतकरी सुकाणू समितीने सोमवार, दि. १२ जून रोजी राज्यातील तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांवर ठिय्या आंदोलन व १३ जून रोजी रेल्वे, रास्ता रोको करून सरकारला अखेरचा इशारा देण्याचे जाहीर केले आहे. येत्या दोन दिवसांत सरकारने कर्जमुक्तीच्या विषयावर सुकाणू समितीसोबत चर्चा करावी अन्यथा १३ जूननंतरच्या तिसऱ्या टप्प्यात मुंबईचे दाणा-पाणी बंद करण्याचे आंदोलन छेडण्याचा इरादाही बोलून दाखविला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, स्वामिनाथन शिफारशींची अंमलबजावणी, त्वरित पीककर्ज आदी मागण्यांसाठी शेतकरी संप सुरू असून, या संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शेतकरी सुकाणू समितीची राज्यव्यापी परिषद गुरुवारी नाशिक येथे घेण्यात आली. या परिषदेस खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, शेकापचे आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील, कॉ. अजित नवले, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्यासह राज्यातील अनेक भागातून शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेपूर्वी सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात काही निर्णय घेण्यात आले. कॉ. अजित नवले यांनी परिषदेत ते मंजुरीसाठी ठेवले. त्यात राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीसाठी स्वयंस्फूर्तीने संपावर उतरलेला असताना काही तथाकथित शेतकरी नेत्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी चर्चा करून शेतकरी कर्जमाफीच्या केलेल्या घोेषणेचा तसेच संप मागे घेण्याच्या कृतीचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामिनाथन शिफारशींची अंमलबजावणी झाल्याशिवाय शेतकरी आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार करण्यात आला. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे अभिनंदन करतानाच, शेतकऱ्यांना यापुढे शेतमाल बाजार समित्यांमध्ये लिलावासाठी आणण्याची परवानगी देण्यात आली.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रश्नावर सुकाणू समितीने सरकारबरोबर चर्चेची तयारी दर्शविली असून, त्यासाठी सरकारवर दबाव वाढविण्यासाठी गुरुवारपासून मंत्र्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला व सोमवारी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयांवर हजारोंच्या संख्येने ठिय्या आंदोलन करण्याचा तर मंगळवारी रेल्वे व रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. १३ जूनपर्यंत सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही तर त्यानंतर सुकाणू समितीची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल. कदाचित या बैठकीत मुंबईचे पाणीही तोडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी, तीन वर्षांपूर्वी भाजपा सरकारसाठी गावोगावी जाऊन मते मागितल्याबद्दल आज पश्चात्ताप होत असल्याचे सांगून, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता, शेतकरी संप फोडणाऱ्या गद्दाराला फार काळ पक्ष संघटनेत ठेवणार नसल्याची घोषणा केली. तर संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी, सरकारने आम्ही सांगितल्याप्रमाणे कर्जमुक्ती दिल्यास राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, अशी हमी आपण लिहून देण्यास तयार असल्याचे सांगितले. आमदार बच्चू कडू यांनी, शेतकऱ्यांचा संप ही तर फक्त सुरुवात असून, ‘पिक्चर अभी बाकी हैं’ असा इशारा दिला. शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करण्याचा उद्योग सरकारने बंद करावा अन्यथा खरोखरच शेतकरी दरोडे घालतील, असे सांगून प्रसंगी पोलीस महासंचालकांच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा केली. आमदार जयंत पाटील यांनी, मुंबईची रसद तोडली तर सरकार वठणीवर येईल, त्यासाठी रायगड व नाशिक जिल्ह्याने मुंबईचा पाणीपुरवठा बंद करण्याची तयारी करावी, असे आवाहन केले. यावेळी निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, अनिल धनवट, कॉ. अशोक ढवळे, माधवराव मोरे आदिंनीही मार्गदर्शन केले.
आमदार जगताप यांना मज्जाव; महिलेला हुसकाविले
शेतकरी आंदोलन राजकीय पक्षविरहित असल्याचे जाहीर करण्यात आल्यामुळे सुकाणू समितीने आयोजित केलेल्या राज्यव्यापी परिषदेसाठी आलेले कॉँग्रेसचे आमदार भाई जगताप यांना व्यासपीठावर बसण्यास मज्जाव करण्यात आला. परिषद सुरू होण्यापूर्वीच भाई जगताप यांचे परिषदस्थळी आगमन झाल्याने त्यांनी व्यासपीठावर खुर्ची पकडली. परंतु काही वेळातच सुकाणू समितीचे पदाधिकारी दाखल झाले व ते खुर्च्यांवर स्थानापन्न झाले असता, परिषदेसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी आमदार जगताप यांना व्यासपीठावर बसू देण्यास हरकत घेतली. शेतकऱ्यांचे आंदोलन राजकारणविरहित असल्याने जगताप यांना बसू देऊ नका, असा धोशा त्यांनी लावला, त्यामुळे संयोजकांनी जगताप यांना व्यासपीठावरून खाली जाण्यास भाग पाडले.
मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणविणाऱ्या कल्पना इनामदार या महिलेलाही व्यासपीठावरून हुसकावून देण्यात आले. परिषद सुरू होताच, इनामदार यांनी व्यासपीठावर चढून मला दोन मिनिटे बोलू द्या, असा आग्रह संयोजकांकडे धरल्यावर त्यांना दोन मिनिटांचा वेळ देण्यात आला, परंतु त्यांनी संयोजकांवर तोंडसुख घेतले. शेतकऱ्यांचे आंदोलन जर पक्षविरहित असेल तर सुकाणू समितीत राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा समावेश कसा केला, असा सवाल त्यांनी विचारताच, शेतकऱ्यांनी गलका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिषदेत गोंधळ उडू लागल्यावर संयोजक व पोलिसांनी कल्पना इनामदार यांना अक्षरश: हुसकावून लावले. परिषदेतून बाहेर पडल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी मात्र आपला आरोप कायम ठेवला. तर त्या भाजपाच्या हस्तक असल्याचा आरोप परिषदेत करण्यात आला. मंत्र्यांच्या गावबंदीवरून शिवसेना अडचणीत
शेतकरी सुकाणू समितीने आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात केंद्र व राज्यातील मंत्र्यांना गावबंदी जाहीर केल्यामुळे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची गोची झाली आहे. शेतकरी संपास शिवसेनेने जाहीर पाठिंबा देऊन कर्जमुक्तीच्या बाजूने आंदोलनही छेडले आहे. अशा परिस्थितीत सुकाणू समितीच्या निर्णयानुसार सेनेच्या मंत्र्यांनाही आता या गावबंदीचा फटका बसणार आहे. गुरुवारपासून गावात येणाऱ्या मंत्र्यांना अडवा व त्यांना कर्जमुक्ती व स्वामिनाथन शिफारशींची अंमलबजावणी कधी करणार याबाबत जाब विचारा व मगच त्यांचा कार्यक्रम होऊ द्या, असे आवाहन सुकाणू
समितीने केले आहे. समितीचा सारा रोख सत्ताधारी भाजपावर असला तरी, सेनाही सत्तेत सहभागी असल्यामुळे त्यांच्या मंत्र्यांनाही शेतकरी रोषास सामोरे जावे लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फोडू : बच्चू कडू संपकरी शेतकऱ्यांना दरोडेखोर ठरवून सरकार त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करीत आहेत, लाठीमार करून शेतकऱ्यांचे डोके फोडत आहे; परंतु त्यांनी हे लक्षात घ्यावे शेतकऱ्यांवर असाच अन्याय होणार असेल तर आम्ही शेतकरी वर्षावर बॉम्ब फोडू. शेतकऱ्यांनी आजवर पीकपद्धती बदलली, खते, बियाणे बदलले, एवढेच नव्हे तर राज्यातील व केंद्रातील सरकारही बदलून पाहिले, परंतु त्यांची परिस्थिती बदलली नाही. उलट मुख्यमंत्री आता म्हणतात, खऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करू. विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणारे देवेंद्र फडणवीस आता बदललेले आहेत. कर्जमुक्तीसाठी राज्यातील शेतकरी पेटून उठला आहे, त्याच्या भावनांशी खेळू नका, उद्या शेतकरी तुमची विमानेसुद्धा उडू देणार नाही याचे भान ठेवा.

Web Title: Now the ministers have sacked villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.