...आता मशिदींमध्येही प्रवेशबंदचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:16 IST2020-03-24T23:20:38+5:302020-03-25T00:16:22+5:30
शहरातील बहुतांश मुख्य दर्ग्यांचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी ३१ मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर संबंधित विश्वस्तांकडून बंद करण्यात आले. यानंतर आता शहरातील सुमारे ५० पेक्षा अधिक मशिदीदेखील ‘लॉकडाउन’ करण्याचा निर्णय शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी मौलवींच्या बैठकीत घेतला. यामुळे आता मशिदींमध्ये दिवसाच्या तीन प्रहरांमध्ये पाचवेळा होणाऱ्या नमाजपठणाला केवळ चार ते सहा लोक (मौलवींसह) हजर राहतील, असे जाहीर केले आहे.

...आता मशिदींमध्येही प्रवेशबंदचा निर्णय
नाशिक : शहरातील बहुतांश मुख्य दर्ग्यांचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी ३१ मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर संबंधित विश्वस्तांकडून बंद करण्यात आले. यानंतर आता शहरातील सुमारे ५० पेक्षा अधिक मशिदीदेखील ‘लॉकडाउन’ करण्याचा निर्णय शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी मौलवींच्या बैठकीत घेतला. यामुळे आता मशिदींमध्ये दिवसाच्या तीन प्रहरांमध्ये पाचवेळा होणाऱ्या नमाजपठणाला केवळ चार ते सहा लोक (मौलवींसह) हजर राहतील, असे जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर आता घरातून कोणही अनावश्यकरीत्या बाहेर पडणार नाही. यामुळे शहरातील सर्वच मशिदींमध्ये नमाजपठणासाठी नागरिकांनी न जाता आपापल्या घरीच नमाजपठण करावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. पोलीस प्रशासनाला नागरिकांनी संपूर्णत: सहकार्य करावे, कोणीही घराबाहेर पडू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारचे सर्व आदेश हे जनतेच्या आरोग्याच्या हिताचे असल्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगून आपापल्या घरातच थांबावे, असेही खतिब यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे. शहरातील जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड, वडाळारोड, देवळाली कॅम्प, विहितगाव, सातपूर या सर्व भागांमधील मशिदींमध्येही नमाज पठणासाठी नागरिकांना जाता येणार नाही. नागरिकांनी नमाजपठणाकरिता घराबाहेर पडू नये, पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. कोरोना आजार हा अत्यंत जीवघेणा असून, या आजारापासून स्वत:सह आपले कुटुंब व परिसराला सुरक्षित ठेवण्याकरिता सर्व शहरासह उपनगरांमधील नागरिकांनी आपापल्या घरांमध्येच थांबणे गरजेचे आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोना आजाराशी सर्वांना एकजुटीने लढा द्यावा लागणार आहे. आपापल्या घरातच थांबून धार्मिक पारंपरिक पद्धतीने अल्लाहची उपासना (इबादत) करावी. या आजाराचे आलेले संकट लवकरात लवकर टळावे, यासाठी प्रार्थना (दुवा) करावी. धर्मग्रंथ कुराणचे अधिकाधिक पठण करण्यास प्राधान्य द्यावे. कुटुंबाची खास काळजी घ्यावी.
- हिसामुद्दीन अशरफी,
शहर-ए-खतीब