नववीची पुस्तके बाजारात अनुपलब्ध
By Admin | Updated: June 11, 2017 00:47 IST2017-06-11T00:47:35+5:302017-06-11T00:47:47+5:30
९ वीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके अजूनही बाजारात उपलब्ध होत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे

नववीची पुस्तके बाजारात अनुपलब्ध
साहेबराव अहिरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथर्डी फाटा : अवघ्या चार-पाच दिवसांत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरु वात होणार असून, ९ वीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके अजूनही बाजारात उपलब्ध होत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. बालभारतीच्या ढिसाळ नियोजनामुळे पुस्तके बाजारात यायला उशीर होत असून, सर्व माध्यमांची सर्व पुस्तके तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी पालक, विद्यार्थी व शिक्षकांकडून होत आहे. सध्या मराठी माध्यमाची केवळ पाचच पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. इतर माध्यमांची आणि मराठी माध्यमाच्या भाषा विषयांच्या पुस्तकांची सर्वांना प्रतीक्षा आहे.
नवीन बालभारतीकडे इयत्ता ८ वी पर्यंतच्या पुस्तकांचा निर्मिती साठा व वितरणाची जबाबदारी होती. यावर्षी नववीच्या क्रमिक पुस्तकांचीही जबाबदारी बालभारतीने घेऊनही अद्यापपर्यंत ९ वीची सर्व पुस्तके बाजारात विक्र ीसाठी खुली न केल्याने पालक, विद्यार्थी व शिक्षक संभ्रमात आहेत. येत्या १५ जूनला सर्वत्र शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. ९ वीला १० वी च्या तयारीचे वर्ष म्हणून विद्यार्थी व शिक्षक अधिक महत्त्व देतात. तयारीला अधिक वेळ मिळण्यासाठी बहुसंख्य शाळा ९ वीचा अभ्यासक्र म लवकर संपवून वार्षिक परीक्षाही लवकर घेतात. जेणेकरून विद्यार्थ्यांची अधिक तयारी करून घेता येईल. या पार्श्वभूमीवर ९ वीच्या सर्व माध्यमांची सर्व पुस्तके बाजारात उपलब्ध होणे गरजेचे होते. सध्या बाजारात एसएससी बोर्ड मराठी माध्यमाची तिन्ही भाषा विषय, सेमी इंग्रजी माध्यमाची व इंग्रजी माध्यमाची सर्व पुस्तके उपलब्ध नाहीत.