पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना वेतनकपातीच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:11 IST2020-02-25T23:37:17+5:302020-02-26T00:11:26+5:30
नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा योजनेवर जिल्हा परिषदेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही त्याप्रमाणात वसुली होत नसल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये करण्यात आलेल्या ठरावानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कर्मचाऱ्यांना वसुली न केल्यास ५० टक्केवेतनकपात करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना वेतनकपातीच्या नोटिसा
नाशिक : नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा योजनेवर जिल्हा परिषदेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही त्याप्रमाणात वसुली होत नसल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये करण्यात आलेल्या ठरावानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कर्मचाऱ्यांना वसुली न केल्यास ५० टक्केवेतनकपात करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. दुसरीकडे या कर्मचाºयांनी आपण तांत्रिक कर्मचारी असून, पाणीपट्टी वसुलीचे आमचे काम नसल्याचा दावा करून, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळावे, अशी मागणी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा, दाभाडी व १२ गावे, देवळा व दहा गावे अशा तीन योजना राबविल्या जात असून, या तिन्ही योजनांपोटी ११ कोटी ३४ लाखांची पाणीपट्टी नांदगाव नगरपालिका, दाभाडी व देवळ्याच्या ज्या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो त्यांच्याकडे थकली आहे. दरवर्षी थकबाकीची रक्कम वाढत जात असल्याने त्याचा बोजा जिल्हा परिषदेवर पडत आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेकडून सात ते दहा कोटी या योजनेवर खर्च केले जातात, परंतु वसुली होत नसल्याने जिल्हा परिषदेचे नुकसान होत असल्याची भावना
सभेत सदस्यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती.
कर्मचाºयांचे जि.प. अध्यक्षांना निवेदन
मंगळवारी कर्मचाºयांनी एकत्र येत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना निवेदन दिले असून, त्यात पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन, व्हॉल्व्ह, एअर व्हॉल्व्ह व विविध कामांची देखभाल, दुरुस्ती करण्याचे काम नियमित करीत आहेत. त्याचबरोबर संबंधित ग्रामपंचायतींना वेळोवेळी भेट देत पाणीपट्टी वसुलीबाबत ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंचांना जाणीव करून दिले जाते. सदरचे कर्तव्य स्वत:हून बजावत असल्यामुळे वेतन कपात करू नये, अशी मागणी केली आहे.