‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ गुन्हेगारी ‘अनकंट्रोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:17+5:302021-09-24T04:16:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इंदिरानगर : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरात सध्या ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ अभियानाची ...

‘No Helmet, No Patrol’ Crime ‘Uncontrolled’ | ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ गुन्हेगारी ‘अनकंट्रोल’

‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ गुन्हेगारी ‘अनकंट्रोल’

लोकमत न्यूज नेटवर्क

इंदिरानगर : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरात सध्या ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ अभियानाची जोरात अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, एकीकडी या अभियानात पोलीस व्यस्त असताना दुसरीकडे गुन्हेगारीचा आलेख वाढला असून, चेन स्नॅचिंग, घरफोडी, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावरील पोलीस बंदोबस्त काढा आणि गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस यंत्रणेचा उपयोग करा, अशी मागणी सर्वसामान्य नाशिकरांकडून जोर धरू लागली आहे.

नाशिक शहर व उपनगरांमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढत असून, गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर उतरण्याची गरज निर्माण झाली आहे; परंतु मागील महिनाभरापासून शहर पोलिसांनी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे नाशिक शहरातील सरकारवाडा, गंगापूर, इंदिरानगर, पंचवटी, सातपूर, उपनगर, नाशिक रोड, देवळाली कॅम्प, अंबड, मसरूळ, आडगाव, भद्रकाली, मुंबई नाका यासारख्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या पेट्रोल पंपावर प्रत्येकी एक पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. अशा प्रकारे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ ते दहा पेट्रोल पंप असल्याने त्या ठिकाणी आठ ते दहा पोलीस कर्मचारी दोन शिफ्टमध्ये अडकले आहेत. याचा थेट परिणाम गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या मनुष्यबळावर होत असून, कर्मचाऱ्यांची संख्या गुन्हेगारी रोखण्यासाठी कमी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे इंदिरानगरसारख्या भागात सोनसाखळीचोरी, वाहनचोरी यासह विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज सर्वसामान्य नाशिककरांमधून व्यक्त होत आहे.

पोलीस व्यस्त, गुन्हेगार मोकाट

नाशिक शहरात जवळपास ७० पेट्रोल पंप असून, या प्रत्येक पेट्रोल पंपावर हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीसाठी दोन वेगवेगळ्या शिप्टमध्ये दोन कर्मचारी रोज कार्यरत असल्याने शहरातील जवळपास १४० कर्मचारी केवळ ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ अभियानाच्या अंमलबजावणीत व्यस्त आहेत. त्यामुळे पाकीटमार, चेन स्नॅचर व घरफोडी करणाऱ्या भुरट्या चोरट्यांसह वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या कारवायांमध्येही वाढ झाल्याचे चित्र सध्या इंदिरानगरसह शहरातील उपनगरांमध्ये दिसून येत आहे.

Web Title: ‘No Helmet, No Patrol’ Crime ‘Uncontrolled’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.