फास्टॅग नाही ना, मग दुपटीने टोल भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 04:12 PM2019-12-15T16:12:59+5:302019-12-15T16:13:56+5:30

 : गणेश शेवरे पिंपळगाव बसवंत : कॅशविना इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी दि. १ डिसेंबरपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आले होते. राज्य महामार्ग आणि शहरी टोल नाक्यावर फास्टॅगने टोल स्वीकारला जात आहे. ज्या वाहनांवर अद्यापही फास्टॅग नसेल त्या वाहनचालकाकडून दुप्पट टोल वसूल करण्यात येत आहे. परिणामी फास्टॅग न लावलेल्या वाहनांमुळे टोल नाक्यावर वाहनांची मोठी गर्दी होऊन मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

  No fastag, then double toll | फास्टॅग नाही ना, मग दुपटीने टोल भरा

फास्टॅग नाही ना, मग दुपटीने टोल भरा

Next
ठळक मुद्दे वाहनांच्या गर्दीने टोल नाक्यावर गोंधळ


गेल्या महिन्याभरापासून फास्टॅग लावण्याची प्रक्रि या बँक व टोल नाका प्रशासनाकडून सुरू आहे. दि. १ डिसेंबरपर्यंत फास्टॅग लावणे बंधनकारक केले होते, परंतु तांत्रिक गोष्टीमुळे अडचणी येत होत्या, त्यामुळे दि. १५ डिसेंबरची वाढीव मुदत देण्यात आली होती तरीदेखील असंख्य वाहनांना अजूनही फास्टॅग लावण्याची प्रक्रि या सुरू असल्याने टोल नाक्यावर मोठी गर्दी निर्माण झाली आहे.
केंद्र व राज्य शासनाने फास्टॅग लागू करण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रोग्रामअंतर्गत दि. १ डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांवर फास्टॅग लावणे अनिवार्य केले होते. फास्टॅगच्या माध्यमातून वाहनांना टोल नाक्यावर न थांबता टोल चुकता करता येणार आहे. त्यासाठी वाहनांवर फास्टॅग लावणे आवश्यक आहे. फास्टॅग हा बँकांकडून खरेदी करून टोल नाक्यावर आॅटोमॅटिक ट्रान्झॅक्शनसाठी वाहनाच्या विंडस्क्र ीनमध्ये फास्टॅग लावला जातो.

वाहनांना फास्टॅग लावल्याचे फायदे
फास्टॅग एक पारदर्शी व्यवस्था असून, मोटारीवर लागलेल्या फास्टॅगच्या मदतीने वाहनचालकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होणार नाही. चोरीची गाडी टोल नाक्यावर गेल्यावर वाहन मालकाला एसएमएस येईल व त्यामुळे गुन्हे आणि गुन्हेगारांवर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे. फास्टॅगला जीएसटी नेटवर्कसोबत जोडण्यात आले आहे. या यंत्रणेत वाहनमालक आणि वाहनाची माहिती असल्याने ही यंत्रणा आधारच्या धर्तीवर काम करणार आहे. इतकेच नव्हे तर सर्व मार्ग फास्टॅगचे झाल्यास केवळ एकाच मार्गावर रक्कम स्वीकारली जाणार आहे. फास्टॅगचा उपयोग करणाऱ्यांना कॅशबॅकचा फायदाही मिळणार आहे.

या अडचणी केव्हा दूर होणार ?
फास्टॅगमुळे वाहनचालकांना फायदा मिळेल, पण सध्या टोल नाक्यावर फास्टॅगबाबत ज्या अडचणी येत आहेत, त्यावर वाहनचालकांना खरंच दिलासा मिळेल का, हा प्रश्न गंभीर आहे. टोल नाक्यावर आताही नेटवर्कची समस्या असल्यामुळे बहुतांशवेळी वाहनचालकांना थांबावे लागते. अनेक ठिकाणी कॅमेरेच सुरळीत नाहीत. त्यामुळे टोल नाक्यावरील कर्मचारी फास्टॅगला हाताने स्कॅन करताना दिसून येताहेत. आताही नाक्यावर फास्टॅगचे मार्ग जास्त नसल्यामुळे फास्टॅग लागलेल्या वाहनांना टोल नाक्यांवर समस्या येत आहेत.

दुचाकीस्वारांना नाहक त्रास; दळणवळणात मोठी कोंडी?
दि. १५ डिसेंबरपासून फास्टॅगची सक्ती केल्याने ज्या वाहनधारकांनी अद्याप वाहनांना फास्टॅग लावलेला नाही त्या वाहनांमुळे टोल नाक्यावर वाहनांची मोठी गर्दी होऊन गोंधळ निर्माण होत आहे. परिणामी ज्यांचा टोलशी संबंध नाही अशा दुचाकीस्वारांना यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. दळणवळणातदेखील अडचण निर्माण होत आहे.


‘फास्टॅग’ नसलेली गाडी विशेष लेनमध्ये आल्यास दंड
देशांतर्गत दळणवळणासाठी सर्व प्रकारच्या गाड्यांना (दुचाकी वगळून) फास्टॅग बंधनकारक केले आहे. जर गाडीला फास्टॅग नसेल आणि गाडी फास्टॅगसाठी बनविलेल्या विशेष लेनमध्ये आल्यास दंड म्हणून दुप्पट टोलवसुली केली जाणार आहे. यामुळे गोंधळात भर पडली आहे.

टोल नाक्यावर विक्र ीची सोय
महामार्गावरील टोल नाक्यावर हे ‘फास्टॅग’ विक्र ीची सोय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या आधीच करण्यात आली आहे. राष्ट्रीय प्राधिकरणाचे एकूण ५३७ टोल नाके आहेत. यापैकी ४१२ टोल नाक्यांवरील सर्व लेन ‘फास्टॅग’ने संचलित केल्या आहेत.

बसला फास्टॅगच वावडं....
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणकडून दि. १ डिसेंबर २०१९ पासून सगळ्याच चारचाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे फास्टॅग लावलेली वाहने टोल नाक्यावर थांबतही नाही, पण महामंडळाची लाल परी याला अपवाद ठरत आहे. टॅग लावूनही टॅग स्कॅन होत नसल्याने बस जास्त काळ टोल नाक्यावर थांबून राहत असल्याने टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांना तो टॅग हाताने स्कॅन करावा लागत आहे.

 ....

 

Web Title:   No fastag, then double toll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.