पेठ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि खबरदारीचा उपाय म्हणून शहरी भागातील शाळा आॅनलाइन पद्धतीने सुरू झालेल्या आहेत. मात्र, आदिवासी अतिदुर्गम भागात आॅनलाइन शिक्षणाला पर्याय म्हणून ‘शिक्षक आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे आॅफलाइन शिक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे ना वर्ग ना फळा, घरोघरी भरली शाळा असे चित्र पहावयास मिळत आहे.पेठ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १८८ शाळा असून, बहुतांश गावे डोंगर दऱ्यामध्ये वसलेले आहेत. शिवाय पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने बºयाच पालकांना अॅण्ड्रॉइड भ्रमणध्वनी खरेदी करून त्यास इंटरनेट रिचार्ज करणे शक्य नसल्याने आॅनलाइन शिक्षणाच्या विविध समस्या निर्माण झाल्या. रेंज आहे तर मोबाइल नाही आणि मोबाइल आहे तर रेंज नाही अशी परिस्थिती असते. शाळा बंद असली तरी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडू नये यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तकांचे घरोघरी जाऊन वाटप केले.शिवाय सर्व विद्यार्थी एकत्र बसवणे शक्य नसल्याने चौकाचौकातील विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना स्वयंअध्ययनाचे नियोजन करून देण्यात आले आहे.-------------तरुणांची मोबाइलमित्र संकल्पनातालुक्यातील ज्या गावांना इंटरनेटची रेंज व पालकांकडे मोबाइल आहे अशा गावातील सुशिक्षित तरु णांची मोबाइलमित्र म्हणून निवड करून त्यांच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व्हिडिओ, चित्रे, नकाशे आदी अध्यापन साहित्य शिक्षक संबंधित अध्यापनाचे कार्य करत आहेत. संबंधित तरुण परिसरातील मुलांना अभ्यास दाखवून त्यांच्याकडून अध्ययन करून घेण्याचा प्रयत्न करतात.कोणत्याही प्रकारची आॅनलाइन शिक्षणाची सुविधा नसलेल्या गावांना विद्यार्थी, शिक्षक, पालक व प्रशासन या सर्वांनाच कसरत करावी लागत असताना पेठ तालुक्यात सुरू असलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत असल्याचे दिसून येत आहे.
ना वर्ग ना फळा, घरोघरी भरली शाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:44 IST