महापालिका : पूर्ण बहुमत, शहराध्यक्षांचा कौल कुणाला? नाशिकरोडचे प्रभाग सभापतिपद भाजपाकडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 01:03 IST2018-04-02T01:03:05+5:302018-04-02T01:03:05+5:30
नाशिकरोड : महापालिकेच्या नाशिकरोड विभागामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाल्याने भाजपाचाच प्रभाग सभापती होणार हे निश्चित आहे.

महापालिका : पूर्ण बहुमत, शहराध्यक्षांचा कौल कुणाला? नाशिकरोडचे प्रभाग सभापतिपद भाजपाकडेच
नाशिकरोड : महापालिकेच्या नाशिकरोड विभागामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाल्याने भाजपाचाच प्रभाग सभापती होणार हे निश्चित आहे. शहराध्यक्ष तथा आमदार कोणाच्या नावाला हिरवा कंदील देतात, हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी नगरसेवक पंडित आवारे यांची प्रभाग सभापतिपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. मागील वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाची एकहाती सत्ता आली. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकरोड विभागामध्ये १९९२ मध्ये भाजपाला भोपळासुद्धा फोडता आला नव्हता. १९९७, २००२, २००७ या तिन्ही पंचवार्षिकमध्ये भाजपाचा दरवेळी एकच तर २०१२ मध्ये भाजपाचे दोनच नगरसेवक निवडून आले होते. मात्र मोदींमुळे ‘अच्छे दिन’ आलेल्या भाजपाने २०१७ मध्ये शिवसेनेला धोबीपछाड देत २३ पैकी १२ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले. तर शिवसेनेने ११ जागांवर विजय मिळविला. कॉँग्रेस, राष्टÑवादी, रिपाइं, मनसे व इतर पक्षांना एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. मनपामध्ये बहुमत मिळविलेल्या भाजपाने बहुतांश नगरसेवकांना ‘पद’ देण्याचा फंडा अवलंबिला आहे. नाशिकरोडच्या भाजपाच्या बारापैकी ११ नगरसेवकांना गटनेता, प्रभाग सभापती, स्थायी समिती सदस्य, विधी समिती, आरोग्य समिती, शहर सुधार समिती, नियोजन मंडळ यावर दोन वर्षांत वर्णी लागली आहे. एकमेव दिनकर आढाव यांना कुठल्याच समितीवर अद्याप पावेतो घेतलेले नाही. तर बहुमतामुळे स्वीकृत नगरसेवक म्हणून नाशिकरोड मंडळ अध्यक्ष बाजीराव भागवत यांना संधी मिळाली आहे. १२ पैकी ७ जण पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर पाच जण एकपेक्षा जास्त वेळा निवडून आले आहेत.
नाशिकरोड प्रभाग सभापतिपदासाठी बहुमत असल्याने शहराध्यक्ष तथा आमदार ज्यांच्या नावाला हिरवा कंदील देतील तो सभापती होईल यात तिळमात्र शंका नाही. पंडित आवारे, शरद मोरे, अंबादास पगारे यांची सभापतिपदासाठी नावे चर्चेत आहेत. पक्ष पातळीवर किंवा नगरसेवकांची याबाबत अद्याप बैठक किंवा चर्चासुद्धा झालेली नाही. मात्र नाशिकरोड प्रभाग सभापतिपदासाठी नगरसेवक पंडित आवारे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे भाजपाच्या गोटातील विश्वसनीय सूत्रांकडून समजते.