नाशिक : महापालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या अधीक्षक अभियंतापदी संदीप नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते कोकण पाटबंधारे विकास महामंडळातून प्रतिनियुक्तीवर येत आहे. याशिवाय आयुक्तांनी शहर अभियंता या महत्त्वाच्या पदासह अन्य काही पदांवरदेखील शासकीय सेवेतून प्रतिनियुक्तीवर अधिकारी मागवले आहेत. त्यामुळे महापालिकेत पुन्हा एकदा परसेवेचे वारे वाहू लागले आहे. नाशिक महापालिकेत अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. तथापि, अनेक पदांवर आता शासकीय सेवेतील अधिकारी प्रतिनियुक्तीवर येत आहेत किंवा नियुक्त झाले आहेत. भुयारी गटार योजनेच्या अधीक्षक अभियंतापदी नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे याच विभागात कार्यकारी अभियंता पदावर काम करणारे कार्यकारी अभियंता संजय घुगे यांच्याकडे नलावडे यांच्या समकक्ष असणारा शहर अभियंतापदाचादेखील अतिरिक्त कार्यभार आहे. दरम्यान, आता लवकर महापालिकेच्या शहर अभियंता, उपआयुक्तया पदांवरदेखील प्रतिनियुक्तीवर अधिकारी येणार असल्याचे वृत्त आहे.
महापालिकेत पुन्हा परसेवेचे वारे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:58 IST