निफाडकरांना कर्फ्यूच्या काळात घरपोच मोफत भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:13 IST2021-05-08T04:13:41+5:302021-05-08T04:13:41+5:30
निफाड : शहरात २० एप्रिल ते २ मे या काळात कडकडीत जनता कर्फ्यू पाळला गेला. ...

निफाडकरांना कर्फ्यूच्या काळात घरपोच मोफत भाजीपाला
निफाड : शहरात २० एप्रिल ते २ मे या काळात कडकडीत जनता कर्फ्यू पाळला गेला. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या काळात नागरिकांची अडचण ओळखून निफाड येथील मातोश्री जसोदाबाई सोनी विकास व सेवा केंद्राने शहरातील नागरिकांना मोफत भाजीपाला घरपोच देऊन मदतीला धावून जाण्याची सामाजिक परंपरा कायम ठेवली आहे.
या १३ दिवसांच्या जनता कर्फ्यू काळात निफाड शहरातील नागरिकांना भाजीपाला मिळणे अवघड होईल, ही अडचण ओळखून निफाडचे माजी नगराध्यक्ष आणि मातोश्री जसोदाबाई सोनी विकास व सेवा केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी या ट्रस्टच्या वतीने शहरातील नागरिकांना मोफत घरपोच भाजीपाला पुरविण्याचे ठरवले. ही सेवाभावी संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यात आली. भाजीपाला पिशव्यांमध्ये पॅकिंग करतांना शेलार स्वतः जातीने लक्ष ठेवून होते. असंख्य कुटुंबाना भाजीपाला असलेली बॅग घरपोच देण्यात आली. यामध्ये टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, डांगर, भेंडी, फ्लॉवर, कोबी, मिरच्या, बटाटा, आलं, लिंबू आदींचा समावेश होता. भाजीपाला घरपोच मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
कोट....
निफाड शहरात जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आल्यानंतर, या काळात भाजीपाला मिळण्यात अडचणी निर्माण होतील. नागरिकांची ही गरज ओळखून ८ दिवस पुरेल, इतका भाजीपाला या केंद्राच्या वतीने शहरातील कुटुंबांना मोफत देण्यात आला. या केंद्राच्या वतीने नेहमीच सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न केला जातो.
- राजाभाऊ शेलार, अध्यक्ष, सेवा केंद्र