गुढ्या-तोरणांनी नववर्षाचे स्वागत
By Admin | Updated: March 28, 2017 01:19 IST2017-03-28T01:19:25+5:302017-03-28T01:19:39+5:30
नाशिक : चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडवा अर्थात नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत

गुढ्या-तोरणांनी नववर्षाचे स्वागत
नाशिक : चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडवा अर्थात नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. मंगळवारी (दि.२८) पहाटे सहापासून शहरातील विविध उपनगरांमधून हिंदू नववर्षाचे स्वागत स्वागतयात्रा, घरोघरी गुढ्या उभारून व नवीन उद्योग व्यवसायांचे विधिवत पूजन करून पारंपरिक पद्धतीने केले जाणार आहे. याशिवाय गृहोपयोगी वस्तू, वाहन, सोने-चांदी आदि विविध वस्तूंच्या खरेदीसाठीचा शुभमुहूर्त असल्याने काहींनी त्यांची आगाऊ बुकिंग करून ठेवली आहे तर अनेकजण पाडव्याच्या दिवशीच खरेदीचा मुहूर्त साधणार आहेत. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर घरोघरी उभारल्या जाणाऱ्या गुढ्यांसाठी लागणारे हार-कडे, काठ्या, वस्त्र, कडुनिंबाचा पाला, फुले आदिंच्या दुकानांवर सोमवारी रात्री उशिरापर्यंत रेलचेल दिसून येत होती. पाडवा आणि श्रीखंड हे समीकरणच असल्याने अनेकांनी आपापल्या आवडत्या फ्लेवरर्सचे (आम्रखंड, केशर, इलायची, ड्रायफुट) श्रीखंड खरेदी करण्यावर भर दिला. पाडव्याच्या मुहूर्तावर नाशिककरांनी इलेक्टॉनिक वस्तू, दुचाकी व चारचाकी वाहने व घरांची खरेदी करण्यासाठी बुकिंगवर भर दिल्याचे दिसून आले. पाडव्याचा मुहूर्त साधत अनेकांनी कूलर, पंखे, एअर कंडिशनर, अॅण्ड्रॉइड मोबाइल, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, इंडक्शन कूकर आदि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आगाऊ बुकिंग केली व पाडव्याला त्याची डिलेव्हरी मिळेल, असे नियोजनही केले आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत व्यावसायिकांनी चांगल्या आॅफर दिल्याने बाजारपेठेत मोठी उलाढाल पहायला मिळाली. पाडव्याला लागणाऱ्या हार-कड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी शहरातील विविध बाजारपेठांमध्ये दुकाने सजली होती. महागाईचा फटका हार-कडे व्यावसायिकांनाही बसल्याचे दिसून आले. साखरेचे दर वाढल्याने यंदा हार-कड्यांचे दरही वाढले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गाठींच्या लहान आकारापासून मोठ्या आकारापर्यंतचे व रंगांचेही प्रकार पहायला मिळत असून, हारांमध्येही अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते.
अशी उभारा गुढी
सकाळी ८.२७ नंतर गुढी उभारण्यास चांगले मुहूर्त आहेत. दरवाजाला तोरण, सडा-रांगोळी, देवपूजा आटोपून गुढी उभारतात. काठीच्या एका टोकाला केशरी वस्त्र बांधून कलशाला गंधाचे पाच पट्टे ओढून हार बांधतात. काठीला आंब्याचा डगळा, निंबाचा पाला बांधून साखरगाठीचे हार व कडे घालून गुढीची पूजा करतात. आगामी वर्ष मंगलमय जावो, यासाठी प्रार्थना करावी.
हार-कडे १० ते ४० रुपये या दरात, नारळ १० रुपये या दरात मेनरोड, शालिमार, अशोकस्तंभ, रविवार कारंजा आदिंसह शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी हार-कड्यांची खरेदी-विक्री झाली. लाल, पिवळा व केशरी यांसह हिरवा, आकाशी असे रंग असल्याने लहान मुले आपल्या आवडीचे रंग असलेले हार-कडे विकत घेण्यासाठी आग्रह धरताना दिसत होते.