सहस्त्रदीपांनी नवीन वर्षाचे स्वागत
By Admin | Updated: January 2, 2015 00:58 IST2015-01-02T00:58:41+5:302015-01-02T00:58:54+5:30
गोदाकाठ उजळला : स्वामी मित्रमेळा प्रतिष्ठानचा उपक्रम; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सहस्त्रदीपांनी नवीन वर्षाचे स्वागत
पंचवटी : स्वामी मित्रमेळा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्षाच्या पूर्वसंध्येला गंगाघाट रामकुंडावर सहस्त्रदीप प्रज्वलन करून नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. संपूर्ण गोदाकाठ सहस्त्रदीपांनी उजळून निघाला होता.
नववर्षाचे स्वागत करताना आजची तरुणाई आरडाओरड करून धांगडधिंगा करतात हे भारतीय संस्कृतीला न शोभणारे आहे. नववर्षाचे स्वागत भारतीय संस्कृतीनुसार करावे, तसेच तरुणांत धार्मिक गोडी वाढावी या हेतूने सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळ्याचे आयोजन केल्याचे स्वामी मित्रमेळा प्रतिष्ठानचे सचिन ढिकले यांनी सांगितले. स्वामी मित्रमेळा प्रतिष्ठान, शिवनेरी युवक मित्रमंडळ, ग्रीन गोदा व पंचवटी पोलीस ठाणे यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी सखा सुमंत सरस्वती यांनी उपस्थित भाविकांना आशीर्वचनपर मार्गदर्शन केले. त्यानंतर पार्श्वगायिका मीना परूळकर-निकम यांचा भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळ्याचे यंदा बारावे वर्ष होते. रात्री दत्तगुरुंच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. (वार्ताहर)