साधुग्राममध्ये नव्याने जागावाटप
By Admin | Updated: September 5, 2015 23:02 IST2015-09-05T23:01:39+5:302015-09-05T23:02:11+5:30
७० संस्थांना प्लॉट : रिकाम्या जागांचे सर्वेक्षण

साधुग्राममध्ये नव्याने जागावाटप
नाशिक : तपोवनातील साधुग्राममध्ये एकीकडे जागेसाठी धार्मिक संस्थांची घालमेल सुरू असताना दुसरीकडे आखाडे, खालशांसाठी जागा ताब्यात घेऊनही त्याकडे पाठ फिरविणाऱ्या ७० जागा पुन्हा ताब्यात घेण्यात आल्या असून, जागेच्या प्रतीक्षेत असलेल्या संस्थांना त्याचा ताबा देण्यात आला आहे. अजूनही साधुग्राममध्ये काही जागा शिल्लक असल्याने त्याचे फेर सर्वेक्षण केले जात आहे.
सव्वातीनशे एकर क्षेत्रावर महापालिकेने साधुग्राम विकसित केले असले तरी, सेक्टर दोन, तीनमध्ये जाण्यास फारसे काही खालसे इच्छुक नाहीत, मात्र तरीही काही संस्थांनी जागेवर कब्जा घेतला आहे. सेक्टर एकमध्ये प्रमुख तीन आखाडे व त्यांच्याशी संलग्न खालशांना जागेबाबत प्राधान्य देण्यात आले. परंतु सुमारे चारशेहून अधिक धार्मिक संस्थांनी केलेली जागेची मागणी पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश आले होते. अनेक संस्थांनी त्यांना मंजूर जागेपेक्षा लगतच्या जागेवर अतिक्रमण केल्याची बाब त्यावेळी उघडकीस आल्याने अशा संस्थांकडून जागा परत घेण्याची कार्यवाही करण्यात आली होती. ज्या खालशांनी अतिक्रमण केले, त्यांची मंजूर जागा रद्द करण्याचा प्रशासनाने इशारा दिल्यानंतर जवळपास ७० प्लॉट्सवरील अतिक्रमणे काढण्यात आली, तर ज्यांनी मंजूर जागेचा ताबाच घेतला नाही त्या जागाही परत घेण्यात आल्या आहेत. ज्या संस्था जागेच्या प्रतीक्षेत आहेत अशा सुमारे ७० संस्थांना दोन दिवसांपूर्वीच नव्याने जागावाटप करण्यात आले असून, त्यांना अन्य सोयी पुरविण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या मते अजूनही काही सेक्टरमध्ये जागा शिल्लक असून, ज्या ज्या संस्थांना जागांचे वाटप करण्यात आले त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी ताबा घेतला किंवा नाही त्याची खातरजमा केली जात आहे.