औष्णीक केंद्रांचा वीज निर्मितीत नवा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:11 IST2021-03-12T23:09:59+5:302021-03-12T23:11:07+5:30
महानिर्मिती कंपनीच्या औष्णीक वीज निर्मिती विभागाने एका दिवसात वीज निर्मितीचा उच्चांक करून स्वत:चा विक्रम मोडीत काढला आहे.

औष्णीक केंद्रांचा वीज निर्मितीत नवा विक्रम
एकलहरेः महानिर्मिती कंपनीच्या औष्णीक वीज निर्मिती विभागाने एका दिवसात वीज निर्मितीचा उच्चांक करून स्वत:चा विक्रम मोडीत काढला आहे.
राज्यात नाशिकसह औष्णीक वीज निर्मितीचे सात केंद्रे असून, त्यांच्यामार्फत बुधवारी (दि.१०) रोजी एका दिवसात १८२.७२१ दशलक्ष युनिटस् म्हणजेच सरासरी ७६१३.३७५ मेगावाट वीजनिर्मिती करण्यात आले. आजवर महानिर्मितीच्या फक्त औष्णिक विद्युत केंद्रांत झालेले सर्वाधिक उत्पादन असून, यापूर्वी १८०.०९९ दशलक्ष युनिटस इतके झाले होते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात महानिर्मितीने वीज निर्मितीचे अनेक नवीन उच्चांक गाठत लक्षवेधी कामगिरी केली आहे. प्रभावी इंधन व्यवस्थापन, उत्कृष्ट कार्यप्रणालीद्वारे कमीतकमी दरात वीज निर्मिती करून राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा दिला आहे. त्यासाठी या केंद्रांना नियमित कोळसा पुरवठा व तंत्रज्ञानाचा वापरामुळे हे शक्य झाले आहे. वीज निर्मितीच्या विक्रमाबद्दल प्रभारी संचालक संचलन राजू बुरडे, संचालक मायनिंग पुरुषोत्तम जाधव, संचालक वित्त बाळासाहेब थिटे, प्रभारी कार्यकारी संचालक अभय हरणे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोट===
महानिर्मिती कंपनी वीज उत्पादनात देशात अग्रगण्य आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. शासनकर्त्यांनी विश्वास व पाठबळ दिले तर नक्कीच विजेच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता या कंपनीत आहे. शासनाधीन असलेल्या वीज निर्मितीची क्षमता वाढवावी. खासगीकरणास प्रोत्साहन देऊ नये. राज्याच्या व पर्यायाने जनतेच्या मूलभूत गरजांची केंद्रे ही शासनाच्या अखत्यारीत असणे फार गरजेचे आहे.
-सूर्यकांत पवार, सेक्रेटरी, इंजिनियर्स फेडरेशन.