पंधरा वर्षात कधी नव्हे इतका ‘तो’ यंदा जुलैमध्ये शहरात बरसला....
By अझहर शेख | Updated: August 8, 2019 14:59 IST2019-08-08T14:56:01+5:302019-08-08T14:59:43+5:30
पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे पुन्हा पावसाचे प्रमाण जिल्ह्यांमधील डोंगररांगाच्या तालुक्यांत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पंधरा वर्षात कधी नव्हे इतका ‘तो’ यंदा जुलैमध्ये शहरात बरसला....
अझहर शेख, नाशिक : यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले तसेच सुरूवातीला मान्सून कमकुवत असल्यामुळे नागरिकांमध्ये पर्जन्यमानाविषयी चिंतेचे ढग दाटू लागले होते; मात्र अचानकपणे लहरी निसर्गाने आपले रूप बदलले आणि वरूणराजाची कृपादृष्टी झाली. त्यामुळे पावसाने मागील सर्व विक्रम मागे टाकले. मागील पंधरा वर्षांमध्ये जुलैअखेर कधी नव्हे इतका पाऊस यावर्षी शहरात पडल्याची नोंद हवामान केंद्राने केली आहे. चालू आठवड्यात अद्याप १९० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. यावर्षी जुलैअखेर ४९७ तर या हंगामात गुरूवारी (दि.८) ९८४ मिमीपर्यंत पाऊस पडला आहे.
शहरासह जिल्ह्यात पावासाची स्थिती जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बिकट बनली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच हवालदिल झाले होते. पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने सलग दहा ते बारा दिवस उघडीप दिली. अचानकपणे पावसाची स्थिती बिघडल्यामुळे शहरासह जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. शहरवासियांना ऐन जुलैमध्ये पाणीकपातीचाही सामना करावा लागला; मात्र जुलैचा दुसरा आठवडा संपत नाही तोच पावसाने मजबुत ‘कम बॅक’ केले. दहा दिवसांच्या उघडीपीची कसर पावसाने भरून काढली. त्यामुळे जुलैअखेर शहरात तब्बल ४९७ मि.मीपर्यंत पाऊस नोंदविला गेला. मागील २००६सालापासून अद्याप इतका पाऊस जुलैमध्ये शहरात कधीही पडल्याची नोंद हवामान केंद्राकडे नाही. त्यामुळे यापुर्वीचे सगळे विक्रम पावसाने मोडीत काढले असून शहरासह जिल्ह्यातील बहुतांश तालुके सुजलाम, सुफलाम होत आहे.
दोन दिवसांपासून विश्रांती
पावसाने दोन दिवसांपासून विश्रांती घेतली असली तरी पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे पुन्हा पावसाचे प्रमाण जिल्ह्यांमधील डोंगररांगाच्या तालुक्यांत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वर्ष - पाऊस (जुलैअखेर मिमी.)
२००४- ११३
२००५ - २३१
२००६- ३५०
२००७ - २८४.९
२००८ - २०१.८
२००९ - २६१.५
२०१७ - १७०.०
२०११ - १४४.५
२०१२ - १७१.१
२०१३ - २३२.७
२०१४- ३३१.९
२०१५- ११६.७
२०१६- ४८१.९
२०१७- ४८०.३
२०१८- २८४.१
--