नाशिकमध्ये नेपाळी ‘कूक’चा गच्चीवर गळा चिरून खून; मृतदेह फेकला जमिनीवर
By अझहर शेख | Updated: April 1, 2024 16:25 IST2024-04-01T16:25:25+5:302024-04-01T16:25:44+5:30
फरार मारेकऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

नाशिकमध्ये नेपाळी ‘कूक’चा गच्चीवर गळा चिरून खून; मृतदेह फेकला जमिनीवर
अझहर शेख, नाशिक : सातपुरच्या कामगारनगरामधील गुलमोहर कॉलनी भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या हॉटेलमधील तरूण ‘कूक’चा अज्ञातांनी रविवारी (दि.३१) मध्यरात्रीच्या सुमारास गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली. महेंद्र प्रकाश सार्की (२२,रा. कौशल्या व्हिला, गुलमोहर कॉलनी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
सातपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामगारनगरमधील गुलमोहर कॉलनीमध्ये कौशल्या व्हिला नावाची अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत हॉटेलमध्ये काम करणारे दहा ते बारा लोक एकत्रितपणे राहत होते. त्यांच्यामध्ये महेंद्र हादेखील राहत होता. रात्रीच्या सुमारास तो माेबाइलवरून कोणाशी तरी बोलत होता. यानंतर तो गच्चीवर गेला आणि तेथेच त्याच्यासोबत घातपात झाला असावा, असा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे. गुलमोहर कॉलनीमधील रस्त्यावर सकाळी मृतदेह एका चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत पडलेला आढळून आल्यानंतर जागरूक नागरिकांनी पोलिसांच्या डायल ११२ हेल्पलाइनवर संपर्क साधून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सातपुर पोलिसांसह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, शेखर देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकही घटनास्थळी पोहचले. यावेळी मृतदेहाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केलेले आढळून आले.
मृतदेहाची ओळख पटवून पंचनामा करत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकिय जिल्हा रूग्णालयात हलविला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार मारेकऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.