Need for electricity saving time due to inadequate natural resources! | अपुऱ्या नैसर्गिक साठ्यांमुळे वीजबचत काळाची गरज !
अपुऱ्या नैसर्गिक साठ्यांमुळे वीजबचत काळाची गरज !

ठळक मुद्देऊर्जा संवर्धन दिनानिमित्त संदेशकोळसा, खनिज साठे अपुरेदैनंदिन कामकाजात वीजबचत शक्य

आजच्या युगात आपण ऊर्जेशिवाय विचार सुद्धा करू शकत नाही. सामान्यत: अन्न वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा म्हणून ओळखल्या जातात, परंतु आजच्या या विकासाच्या युगात ऊर्जेचाही मूलभूत गरजा म्हणून समावेश करावा लागेल. आज ऊर्जेची गरज नैसिर्गक इंधनाचे साठे मर्यादित असून, कोळसा आणि खनिज तेल कमी प्रमाणात शिल्लक आहेत. दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात वापर होत असलेली विद्युत ऊर्जेची निर्मितीदेखील कोळशापासून केली जाते. ऊर्जेच्या अव्याहतपणे होत असलेल्या वापरामुळे ऊर्जेचा तुटवडाही भासत आहेत. तसेच यामुळे ग्लोबल वार्मिंगसारख्या गंभीर समस्यांना जगास सामोरे जाण्यासाठी ऊर्जेचा काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर करून अनावश्यक वापर टाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी ऊर्जा संवर्धनाविषयी सर्व घटकांमध्ये जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. दरवर्षी दिनांक १४ डिसेंबर हा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा केला जातो. त्यादृष्टीने विजेची बचत म्हणजेच संवर्धन करण्याची गरज भासते.
सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला जसे अन्न, पाणी आणि हवा यांची गरज असते, तसेच विजेचीही गरज असते. आज आपल्या दैनंदिन आयुष्यातली अर्ध्याहून अधिक कामे ही विजेवरच अवलंबून असतात. अशा या विजेची बचत केली नाही तर, भविष्यात आपल्याला विजेचा तुटवडा जाणवेल. बचतीसाठी खूप मोठे असे काही काम करावे लागत नाही किंवा खूप मोठा त्यागही करावा लागत नाही. वीजबचतीचे काही साधारण उपाय केले की वीज सहज वाचू शकते. प्रत्येकाने वीजबचत केली तर त्याचा नक्कीच फायदाच होणार आहे. विज्ञानानुसार वीज ही निर्माण करावी लागते, वीज साठवून ठेवण्याच्या यंत्रणा महागड्या आहेत. विजेचे उत्पादन व वहन यासाठी लाखो मीटरच्या वाहिन्यांचे जाळे आणि उपकेंद्रे निर्माण करावी लागतात. ज्या धातूमधून वीज वाहून नेली जाते त्या धातुमुळे काही प्रमाणात विजेची घट होते याचाच अर्थ असा की विजेचे वहन होत असताना काही प्रमाणात वीज वाया जाते. यासाठी सगळ्यांनी विजेचा योग्य वापर केला तर विजेची बचत होईल अगदी साध्या सोप्या पद्धतीचा वापर करून वीज वाचवता येऊ शकेल.
याशिवाय घरगुती स्तरावर अनेक छोटे बदल केले आणि वीज वापराच्या सवयी बदलल्या तर त्या माध्यमातून वीजबचत होऊ शकते.
१) घरात विजेचा वापर करताना आय.एस.आय. प्रमाणित तारांचा तसेच ऊर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्या व स्टार लेबल असलेल्या उपकरणांचा वापर करावा. जेवढे जास्त स्टार तेवढी जास्त ऊर्जा बचत होते. स्वस्त आणि दर्जाहीन तारामुळे विजेचा सुयोग्य वापर होऊ शकत नाही तसेच अशा तारांमुळे आग लागण्याची शक्यताही तितकीच असते म्हणूनच प्रमाणित उपकरणे वापरली तर सुरक्षितता आणि बचत होऊ शकते.
२) विजेची उपकरणे स्वच्छ असतील तरच जास्त ऊर्जा मिळेल आणि विजेचा वापर कमी होईल.
३) इस्त्रीची निवड करताना स्वयंचिलत इस्त्री खरेदी करावी जेणेकरून विशिष्ट तापमानाला इस्त्री बंद होईल.
४) फ्रीजमधून वस्तू काढताना आवश्यक वस्तू एकदाच काढाव्यात, जेणेकरून फ्रीज सतत उघडावा लागणार नाही. सतत फ्रीज उघडल्याने फ्रीजचे तापमान बिघडते आणि जास्त वीज खर्च होते. डीफ्रास्ट करावे लागणारे रेफ्रिजरेटर आणि फ्रीज नियमतिपणे डीफ्रास्ट करावेत बर्फ जमा झाल्यामुळे मोटर चालू ठेवण्यासाठी फ्रीजला जास्त ऊर्जा लागते. रेफ्रिजरेटर आणि भिंत यांच्यामध्ये पुरेशी जागा ठेवावी जेणेकरून रेफ्रिजरेटरच्या भोवती हवा सहजपणे खेळती राहील. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले पदार्थ झाकून ठेवावेत कारण झाकण न ठेवल्यामुळे अन्नातील बाष्प उडून जाते आणि कॉम्प्रेसरला अधिक काम करावे लागते.
५) कित्येकजण सायंकाळी बल्ब लावतात आणि गरज नसताना सुद्धा रात्रभर चालू असतात. ज्या खोलीत कमी वापर असेल किंवा कोणीही नसेल, त्या खोलीतील बल्ब बंद करावेत. तसेच कित्येकदा एका खोलीत दोन बल्ब, लॅम्प असतात. घराला आकर्षक बनवण्यासाठी याचा वापर केला जातो असे अनावश्यक बल्ब गरज नसल्यास बंद करावेत.
६) शहरातील बहुतेक व ग्रामीण भागात वीज पंपाने टाकीत पाणी चढवावे लागते. बºयाचदा टाकी भरून वाहत असताना सुद्धा विद्युत पंप बंद करीत नाही किंवा त्यांच्या लक्षात राहत नाही. यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. या समस्येसाठी बाजारात स्वयंचलित यंत्रणा मिळते या यंत्रणेत पाण्याची टाकी भरली की विद्युत पंप बंद होतो या यंत्रणेचा वापर केला तर कित्येक युनिट वीज सहज वाचेल.
७) वाशिंग मशीन, ओव्हन, रोटीमेकर यांसारख्या वस्तू वापरताना टायमरचा वापर करावा आणि टायमर वाजला की लगेच उपकरणे बंद करावे.
८ ) एसी आणि टीव्ही हे रिमोटने बंद केले जातात. पण त्याचा मेन स्वीच बंद करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. असे न करता रिमोटने टीव्ही किवा एसी बंद केल्यानंतर लगेचच मेन स्वीच बंद करावा.
९ ) एअर कंडिशनरचे बिलही जास्त येते तसच वीजही जास्त खर्च होते. काही जण एकदा एसी बसविल्यानंतर तो खराब होईपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. दर महिन्याला एसीचा फिल्टर तपासून स्वच्छ करून घ्यावा. यामुळे थंडावा वाढेल आणि ऊर्जेचा वापर कमी होईल. एसी चालू असताना दरवाज्या खिडक्या व्यवस्थित बंद आहेत ना याची खात्री करून घ्यावी. थंड हवा बाहेर जात असेल तर कुलिंग कमी होत तर जास्त ऊर्जा खर्च होते. एसीचा दिवसा वापर करताना तुमच्या खोलीमध्ये सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्या, पण तुम्हाला नैसर्गिक सूर्यप्रकाश हवा असेल तर, खिडक्यांवर रिफ्लेक्टिव फिल्मचा वापर करू शकता अशा रिफ्लेक्टिव फिल्म्स प्रकाशाला अडथळा न आणता ४० ते ६० टक्के उष्णता कमी करतात. या उपायामुळे वीजही वाचेल आणि तुमची खोली प्रकाशित होईल. एसी सुरू असताना पंखेही चालू असतील तर हवा घरभर खेळती राहते. एसीची सर्व्हिसिंग वेळोवेळी करा.
१०) एसीची देखभाल आणि वीजबचतीनंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हल्ली सगळेच जण सीएफएल दिवे किंवा ट्यूब वापरतात कारण त्याने विजेची बचत होते हे खरे आहे की सीएफएलमुळे वीजबचत होते, पण ही उपकरणे सुरुवातीच्या काही सेकंदात अधिक वीज खेचतात. सीएफएल ट्यूब सुरू केल्यानंतर जेवढी ऊर्जा खेचते त्या ऊर्जेत तोनंतर दोन तास ऊर्जा देते म्हणून सीएफएल दिवे लावल्यानंतर किमान तासभर तरी तो बंद करू नये जितक्या वेळा हे दिवे चालू बंद केले जातील तितक्या वेळ अधिक ऊर्जा खर्च होते आणि त्याच आयुष्यही कमी होते, त्यामुळे आधुनिक सीएफएल दिवे चालू केल्यावर जास्त वेळ, ठेवा तसेच गरज नसल्यास चालू करू नका.
११) ज्या उपकरणांमध्ये कॉइलचा वापर केला जातो. ती सगळीच उपकरणे अधिक वीज खातात. त्यात सर्वाधिक वीज खाणारा म्हणजे पंखा जास्तीत जास्त ऊर्जा खेचून घेतो आणि त्याची हवा कमी लागते.
१२) बºयाचदा देवघर वा इतरत्र झिरो बल्ब सतत सुरू असतो, झिरो बल्ब असला तरी हा बल्ब सुमारे १२ ते १५ वॅटचा असतो. या झिरो बल्बपेक्षा सीएफएलचा वा एलईडीचा १ ते ३ वॅटचा बल्ब लावल्यास त्याचा उजेडही जास्त येतो. त्यामुळे वीजही फारशी खर्च होत नाही.
१३) हल्ली सर्वांकडेच मोबाइल आहेत. अनेकजण मोबाइल चार्जिंगला लावून आपली कामे करतात. काम संपल्यानंतर किंवा मोबाइल ची गरज भासल्यावर मोबाइल घ्यायला येतात. तोपर्यंत मोबाइल चार्ज होत असतो बºयाचदा मोबाइल चार्ज झालेला असतो फक्त दुर्लक्ष केल्यामुळे वीज उगाचच जळत असते. या पद्धतीमुळे वीज तर जळतेच तसेच मोबाइल गरम होते, अनेकजण मोबाइल चार्जिंगच बटन बंद करायला विसरतात आणि फोन ठेवेपर्यंत चार्जिंग चालूच असते आणि वीज खर्च होते. यातील काही मंडळी तर फोन आला की बटन बंद करायला तर विसरतात आणि फोनवर बोलून झाल्यानंतर तो फोन पुन्हा चार्जिंगला ठेवत नाही आणि आपल्या कामाला लागतात, यामुळे चार्जर तर गरम होतोच तसेच विनाकारण वीजही जळते.
१४) आंघोळीसाठी पाणी गरम करताना गिझरचाच प्रामुख्याने वापर केला जातो. काही जणांना अगदी गरम पाणी लागते म्हणून आंघोळ होईपर्यंत गिझर चालू ठेवतात यामुळे वीज खर्च होते. या गोष्टीला आळा बसण्यासाठी बादलीत एकदाच पाणी घ्यावे आणि गिझर लगेचच बंद करावा. अशा सवयीमुळे काही गुंतवणूक न करता एकूण वीज वापराच्या ५ ते १० टक्के विजेची बचत नक्कीच करता येऊ शकते. वीज वापरातील १ युनिटची बचत म्हणजेच २ युनिटची निर्मिती आहे.
एकूणच दैनंदिन जीवनातदेखील सोप्या सोप्या गोष्टींमुळे वीजबचत करणे शक्य आहे.

- विकास आढे,
जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नाशिक परिमंडळ 

 

Web Title: Need for electricity saving time due to inadequate natural resources!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.