सावधानतेचीच गरज !
By किरण अग्रवाल | Updated: April 15, 2018 01:21 IST2018-04-15T01:21:25+5:302018-04-15T01:21:25+5:30
घरात घुसून चोरी करण्याऐवजी आधुनिक तंत्राच्या माध्यमातून ‘आॅनलाइन’ गंडा घालण्याचे वा लुबाडणुकीचे प्रकार हल्ली वाढले असून, त्यास संबंधितांचा वेंधळेपणाच कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

सावधानतेचीच गरज !
घरात घुसून चोरी करण्याऐवजी आधुनिक तंत्राच्या माध्यमातून ‘आॅनलाइन’ गंडा घालण्याचे वा लुबाडणुकीचे प्रकार हल्ली वाढले असून, त्यास संबंधितांचा वेंधळेपणाच कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोणतीही बँक आपल्या ग्राहकांचा इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड व तत्सम माहिती कधीही फोन अगर ‘एसएमएस’द्वारे मागत नाही. तसे वेळोवेळी बँकांकडून सभासदांना सांगितलेही जाते. तरी काही महाभाग बँकेतून फोन आला असे खरे मानून बँक खात्याशी संबंधित माहिती देऊन बसतात आणि नंतर खात्यातील रक्कम काढली गेल्याचे लक्षात आल्यावर कपाळावर हात मारून घेतात. अलीकडे अशापद्धतीने फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. पल्याकडील वेंधळेपणाची मानसिकताच त्यास कारणीभूत आहे. कोणत्याही चौकशीला सामोरे जाताना सारासार विचारच केला जात नाही. त्यातून भाबडेपणाने माहिती दिली जाते व पुढे तोंड झोडून घेण्याची वेळ येते. मध्यंतरी बँकेत भरणा करावयास आलेल्या व्यक्तीकडील लाखो रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याच्याही घटना घडल्या. यातील समानसूत्र म्हणजे, रक्कम असलेल्या व्यक्तीला पैसे खाली पडल्याचे सांगून त्याची बॅग लांबविली जाते. तेव्हा, नेहमी घडणाऱ्या अशा प्रसंगांपासून बोध का घेतला जात नाही, हा यातील प्रश्न आहे. मागे अशाच रस्त्यावरील लुटीच्या काही घटना वाढल्या होत्या. पुढे दंगल चालू आहे. तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा, असे सांगून महिलांना गंडविल्याच्या या घटना होत्या. त्यातही महिला-भगिनींचे असे भाबडेपणच चोरट्याच्या उपयोगी पडत असे. या भाबडेपणाचा कळस लक्षात आणून देणारी एक अशीच घटना अलीकडे घडली आहे. विवाहसंबंध जुळविणाºया एका संकेतस्थळाच्या माध्यमातून परिचय झालेल्या एका भामट्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवून नाशकातील एका विधवा महिलेस तब्बल सात लाख रुपयांना गंडविले. या अमेरिकेतील कथित वराच्या प्रस्तावास भुलून सदर महिलेने त्यासंबंधी खातरजमा करून घेण्याची तसदी न घेता स्वत:ची फसवणूक करून घेतली. भाबडेपणा किती असावा यालाही काही मर्यादा असावी की नाही? पण विवेकबुद्धीचा वापरच कुणी करणार नसेल तर अशांची फसवणूक होण्यापासून कुणी रोखू शकत नाही. भामट्यांनाही घरात शिरून चोरी करण्याची ‘रिस्क’ घेण्यापेक्षा अशी लुबाडणूक करणे अधिक सोयीचे ठरते. तेव्हा, सावधानता व सजगता हाच यावरील उपाय आहे. प्रत्येकानेच त्यासंबंधीची काळजी घेतलेली बरी !