ग्रामीण संमेलने चळवळ बनण्याची गरज -रामदास वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:13 IST2018-02-25T00:13:35+5:302018-02-25T00:13:35+5:30
सामान्य माणसांसह शेतकºयांचे दु:ख, वेदना साहित्यात प्रभावीपणे दिसत नाही, ग्रामीण संस्कृतीदेखील नजरेआड होत चालली असून, गावागावातील हरवत चाललेले चेहरे परत मिळवून देण्याचे काम साहित्यिकांनी करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामीण साहित्य संमेलनांनी चळवळ बनून पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष रामदास वाघ यांनी केले.

ग्रामीण संमेलने चळवळ बनण्याची गरज -रामदास वाघ
वाडीवहे : सामान्य माणसांसह शेतकºयांचे दु:ख, वेदना साहित्यात प्रभावीपणे दिसत नाही, ग्रामीण संस्कृतीदेखील नजरेआड होत चालली असून, गावागावातील हरवत चाललेले चेहरे परत मिळवून देण्याचे काम साहित्यिकांनी करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामीण साहित्य संमेलनांनी चळवळ बनून पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष रामदास वाघ यांनी केले. इगतपुरी तालुका साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित १९ वे ग्रामीण साहित्य संमेलन शनिवारी वाडीवºहे येथील जिल्हा प्राथमिक शाळेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रथम सत्रात संमेलनाचा आरंभ ग्रंथदिंडीने झाला. त्यानंतर कवी विवेक उगलमुगले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, प्रा. देवीदास गिरी, विजयकुमार मिठे, कवी तुकाराम धांडे, संजय जाधव, देवीदास खडताळे, सरपंच प्रीती शेजवळ, स्वागताध्यक्ष व उपसरपंच रावसाहेब कातोरे आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक वाघ पुढे म्हणाले, ग्रामीण भागात आता कोंबडा आरवताना दिसत नाही, आई जात्यावर गाताना दिसत नाही, भूपाळी कानी पडत नाही, वासूदेव बेपत्ता झाला आहे. गावाची गल्ली झाली असून, अतिक्रमणांमुळे सडा-रांगोळी घालण्यासाठी अंगणेही उरलेली नाहीत, याचा अर्थ ग्रामीण संस्कृती हरवत चालली आहे. अशा परिस्थितीत आलिशान बंगल्यात बसून ग्रामीण जीवनावर कथा-काव्य लिहून ग्रामीण साहित्याला सुगीचे दिवस येणार नाहीत, त्यासाठी ग्रामीण साहित्यिकांनी साहित्य चळवळीचे नेतृत्व केले पाहिजे, असेही वाघ यांनी स्पष्ट केले. उद्घाटनपर भाषणात विवेक उगलमुगले यांनी ग्रामीण भागात अव्याहत सुरू असलेल्या या साहित्य दिंडीचा यथार्थ शब्दात गौरव करीत या चळवळीला बळ देण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कातोर, प्रा. गिरी, झनकर, गवांदे, मिठे आदींनी मनोगत व्यक्त केले. इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर यांनी प्रास्तविकात या संमेलनांमुळे अनेक नवोदितांना व्यासपीठ मिळाल्याचे नमूद केले. यावेळी ज्योत्स्ना पाटील यांच्या ‘चला हटके शुभेच्छा देऊया’ तसेच विद्या पाटील यांच्या ‘अक्षरधन’ या चारोळीसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन अॅड. ज्ञानेश्वर गुळवे यांनी केले. आभार प्रदर्शन बाळासाहेब पलटणे यांनी केले. द्वितीय सत्रात दत्तात्रय झनकर यांच्या अध्यक्षतेखाली सुनील गायकवाड, अॅड. धमेंद्र चव्हाण व संजय दोबाडे यांनी कथाकथन केले. सूत्रसंचालन मालुंजकर यांनी केले. तृतीय सत्रात रवींद्र मालुंजकर यांच्या अध्यक्षतेखाली खुले कविसंमेलन पार पडले. सूत्रसंचालन राजेंद्र उगले व विलास पगार यांनी केले.
साहित्य मंडळाकडून सर्वतीर्थ पुरस्कार प्रा. पुंडलिक गवांदे, ज्ञानदूत पुरस्कार बबिता घोती, जीवनगौरव पुरस्कार रवींद्र पाटील, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार निवृत्ती गुंड, काव्यरत्न पुरस्कार प्रशांत केंदळे, कर्तृत्ववान महिला गौरव पुरस्कार ललिता वीर, कृषी सन्मान पुरस्कार सुनील शेजवळ, तर काव्य स्पर्धेसाठी प्रा. सुमती पवार, डॉ. बाळ घोलप, दत्ता देशमाने, कथा स्पर्धेसाठी प्रा.विठ्ठल सदामते, ललित लेखन स्पर्धेसाठी शारदा गायकवाड, प्रभा कोठावदे, तर अक्षरदूत पुरस्कार डॉ.भास्कर म्हरसाळे, संजय वाघ, विकास ननावरे व नवनाथ गायकर यांना देऊन गौरविण्यात आले.