राष्ट्रवादीकडून सदस्यांना चुचकारण्याचे प्रयत्न
By Admin | Updated: March 29, 2017 01:01 IST2017-03-29T01:00:48+5:302017-03-29T01:01:30+5:30
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपासोबत जाऊन फरफट झाल्याचा दावा करीत आता तरी शिवसेनेसोबत चला, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीच्या एका गटाने दिल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रवादीकडून सदस्यांना चुचकारण्याचे प्रयत्न
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपासोबत जाऊन फरफट झाल्याचा दावा करीत आता तरी शिवसेनेसोबत चला, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीच्या एका गटाने दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पंडित कॉलनीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या या बैठकीकडे पक्षातील अनुभवी सदस्यांनी पाठ फिरविल्याची चर्चा असल्याने ही बैठक निष्फळ ठरल्याचा दावा भाजपाने केल्याचे समजते. अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सोेमवारी (दि.२७) पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच पाच एप्रिलच्या विषय समिती सभापती पदाच्या घडामोडींसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून हालचालींना सुरुवात झाली आहे. पंडित कॉलनीत एका बॅँकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गटनेत्यांच्या उपस्थितीत काही सदस्यांची बैठक झाल्याचे समजते. या बैठकीस राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडून आलेल्या निम्म्याहून अधिक सदस्य उपस्थित असल्याचे कळते. या बैठकीत आगामी विषय समिती सभापती निवडणुकांमध्ये नेमकी काय भूमिका घ्यावी, भाजपासोबत राहून विरोधी पक्षात राहायचे की, पहिली चूक सुधारून शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होऊन पदरात पडतील तितक्या विषय समिती सभापतिपद मिळवावे, असा चर्चेचा नूर असल्याचे समजते. जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनीच चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे गटनेते उदय जाधव यांना सदस्यांची बैठक घेऊन त्यांच्या भावना जाणून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसारच ही बैठक झाल्याची चर्चा आहे. आता लवकरच वरिष्ठ पातळीवर या बैठकीची माहिती देण्यात येऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)