राष्ट्रवादी-शिवसेनेचे गुफ्तगू
By Admin | Updated: March 28, 2017 01:38 IST2017-03-28T01:38:33+5:302017-03-28T01:38:46+5:30
नाशिक : आगामी दि. ५ एप्रिलला होणाऱ्या विषय समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी (दि.२७) सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत

राष्ट्रवादी-शिवसेनेचे गुफ्तगू
नाशिक : आगामी दि. ५ एप्रिलला होणाऱ्या विषय समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी (दि.२७) सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. सोमवारी (दि.२७) शिवसेना-राष्ट्रवादी आणि शिवसेना-माकपाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेसोबत नेमकी कॉँग्रेस-माकपा की राष्ट्रवादी यांची आघाडी होते, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, येत्या दि. ५ एप्रिलला विषय समित्यांवरील सभापती पदाची गुढी शिवसेना नेमकी कोणत्या साथीदारांना सोबत घेऊन उभारते, याबाबतही जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे व उपाध्यक्ष नयना गावित यांनी सोमवारी (दि.२७) पदभार स्वीकारला. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना जिल्हा परिषदेत उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. या पदभारप्रसंगी शिवसेनेसह सर्वपक्षीय सदस्य उपस्थित होते. त्यात शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्य तसेच पदाधिकाऱ्यांनी खासगीत चर्चा केल्याचे समजते. चर्चेचा अधिकृत तपशील समजला नसला तरी ही चर्चा विषय समिती निवडणुकांबाबतच असल्याचे कळते. तिकडे कालिदास कलामंदिरात आदिवासी सेवक पुरस्कार वितरणासाठी माकपाचे पदाधिकारी उपस्थित होते. तेथेही माकपा व शिवसेनेच्या सदस्यांनी चर्चा केल्याचे समजते. ही चर्चाही आगामी पाच एप्रिलच्या विषय समिती निवडणुकींबाबतच असल्याचे कळते. (प्रतिनिधी)