पंचवटीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीला पोलीस छावणीचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:31 IST2020-12-08T13:29:02+5:302020-12-08T13:31:25+5:30

बाजारसमितीच्या आवारात निदर्शने वगैेरे होऊ नय, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून चोख पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे

The nature of the police camp for Panchavati Bazar Samiti | पंचवटीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीला पोलीस छावणीचे स्वरुप

पंचवटीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीला पोलीस छावणीचे स्वरुप

ठळक मुद्देद्वारका चौफुलीवरही फौजफाटाविनापरवानगीने निदर्शने केल्यास पोलिसांकडून कारवाई

नाशिक : येथील पंचवटीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा सकाळी तैनात करण्यात आल्याने बाजार समितीला जणू पोलीस छावणीचे स्वरुप पहावयास मिळत आहे. सकाळी काही कार्यकर्त्यानी प्रवेशद्वारावर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली होती. यानंतर पोलिसांनी धाव घेत प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. राज्य राखीव दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले आहे. विनापरवाना कोणालाही बाजारसमितीच्या आवारात निदर्शने करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कुठल्याहीप्रकारे निदर्शने विनापरवानगीने केल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे बाजारसमितीत शुकशुकाट पहावयास मिळत आहे. शेतकरीराजा आज बाजारसमितीकडे फिरकलाच नाही, यामुळे बाजारसमितीत निरव शांतता पसरलेली पहावयास मिळत आहे. दरम्यान, बाजारसमितीच्या आवारात निदर्शने वगैेरे होऊ नय, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून चोख पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यासह स्ट्रायकिंग फोर्स, राज्य राखीव दलाच्या काही जवानांनाही येथे पाचारण करण्यात आले आहे.


द्वारका चौफुलीवरही फौजफाटा
शहरातील मुख्य वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जाणाऱ्या द्वारका येथील चौफुलीवर सकाळपासून पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. द्वारका चौफुली येथे रास्ता रोको करण्याची काही संघटनांनी तयारी केल्याची कुणकुण पोलिसांना लागल्यामुळे पोलिसांनी याठिकाणी वेळीच धाव घेत बंदोबस्तामध्ये वाढ केल्याचे चित्र पहावयास मिळाले. द्वारका चौकात नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे या दोन राष्ट्रीय महामार्गांसह नाशिक शहरातील लहान-मोठे असे एकूण १७ रस्ते एकत्र येतात. यामुळे या चौकात जर कुठल्याही कारणाने वाहतुकीचा खोळंबा झाला तर त्याचा ताण शहरातील अन्य चौकांमध्येही पहावयास मिळतो. यामुळे पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

Web Title: The nature of the police camp for Panchavati Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.