नाशिकला वाळू तस्करांचा पाठलाग करून गाड्या पकडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 14:29 IST2018-01-16T14:28:00+5:302018-01-16T14:29:53+5:30
नाशिक जिल्ह्यातील २४ वाळूच्या ठिय्यांच्या लिलावाची प्रक्रीया गौणखनिज विभागाने सुरू केली असताना, दोन वेळा जाहीर लिलावासाठी जाहीरात देवूनही वाळू ठेकेदारांनी लिलावाकडे पाठ फिरवि

नाशिकला वाळू तस्करांचा पाठलाग करून गाड्या पकडल्या
नाशिक : उच्च न्यायालयाने राज्यातील वाळू लिलावाला स्थगिती दिलेली असतानाही सारंगखेडा, तापी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून तस्करांकडून त्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असून, नाशिक शहरात चोरी, छुप्या पद्धतीने आणल्या जात असलेल्या वाळूच्या गाड्या महसूल विभागाच्या भरारी पथकाने पाठलाग करून पकडल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील २४ वाळूच्या ठिय्यांच्या लिलावाची प्रक्रीया गौणखनिज विभागाने सुरू केली असताना, दोन वेळा जाहीर लिलावासाठी जाहीरात देवूनही वाळू ठेकेदारांनी लिलावाकडे पाठ फिरविली. प्रशासनाने तिसºयांदा फेरलिलावाची तयारी करतांना वाळू लिलावासाठी अपसेट रक्कम कमी करण्याची तयारी चालविली असतानाच गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने वाळू लिलावांना स्थगिती दिली आहे. असे असतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर चोरी, छुप्या पद्धतीने वाळूची वाहतूक केली जात आहे. यंदा वाळू लिलावाला स्थगिती मिळाल्यामुळे प्रशासनाला वाळू लिलावातून मिळणाºया रक्कमेला मुकावे लागणार असल्याने त्यावर तोडगा म्हणून महसूल विभागाने गौण खनिजाच्या चोरी विरूद्ध मोहिम उघडून त्यासाठी भरारी पथके तैनात केली आहेत. साधारणत: रात्री व पहाटेच्या वेळी नाशिक शहरात वाळू तस्कारांकडून वाळूची वाहतूक केली जात असल्याने याच काळात महत्वाच्या ठिकाणांवर भरारी पथके तैनात करण्यात आले आहेत. रविवारी शासकीय सुटीच्या दिवशी महसूलची पथके सुटीवर असल्याचे समजून मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक सुरू असल्याने अशा जवळपास चार मोठे ट्रक मुंबई-आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी अडविण्यात आले. चालकांकडे वाळू वाहतुकीचा परवाना तसेच रॉयल्टी भरल्याची पावती मागितली असता ती नसल्याने सदर वाळू चोरीची असल्याच्या संशयावरून ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये सारंगखेडा, तापी नदीतील वाळू असून, या वाळूला नाशिक व मुंबईत चांगली मागणी असल्यामुळे साधारणत: पाच हजार रूपये ब्रास या दराने वाळूची विक्री केली जात आहे. नाशिक तहसिल कार्यालयाने वाळू तस्करांविरूद्ध मोहिम उघडली असून, वाळूच्या दराच्या पाचपट दंड आकारणीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यातून लाखो रूपये महसूल गोळा झाला आहे.