एस.टी. महामंडळाच्या सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 17:18 IST2018-01-10T17:16:37+5:302018-01-10T17:18:12+5:30

एस.टी. महामंडळाच्या सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ
नाशिक : सुरक्षितता ही व्यापक अर्थाने सर्वांसाठीची सतर्कता असल्याने सेवा बजावत असताना सुरक्षिततेला जाणीवपूर्वक महत्त्व देणे अपेक्षित आहे. ज्या परिस्थितीत आपल्याला सेवा बजवावी लागते, कुटुंबापासून दूर रहावे लागते, संवेदनशील काळात जोखीम घेऊन काम करावे लागते या सर्व बाबींचा विचार केला तर सुरक्षितता केवळ मोहिमेपुरती नसून ती आपल्यासाठीची सतर्कताही असते याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. बी. काळे यांनी केले.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने १० ते २५ जानेवारी या काळात सुरक्षितता सप्ताह राबविला जाणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. बी. काळे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील कासले, सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, पोलीस उपनिरीक्षक अनिल बागुल, प्रादेशिक परिवहन अधिकारी अहिरे उपस्थित होते. विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना निष्काळजीपणा आणि अतिआत्मविश्वास यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे सांगितले. वाहतूक व्यवस्थेसाठीच्या ज्या काही उपाययोजना सरकारकडून केल्या जातात त्याचा नेमका गैरफायदा घेतला जातो आणि अपघात त्यामुळे वाढतात. वेगमर्यादा, सिग्नल तोडणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे सांगून रस्ते अपघातात महाराष्टÑ देशात प्रथम असल्याने ही चिंतेची बाब असल्याचे जोशी यांनी सांगितले....या चालकांचा झाला गौरव
सुरक्षित सेवा देणारे चालक पंचवटी आगाराचे विठ्ठल शेलार, पिंपळगाव आगाराचे रमण गांगुर्डे, नाशिक-१ आगारातील लहानू पगार, संजय काळे, बाबाजी गवळी, संजय पवार, विजय आव्हाड, कैलास काळे, गणेश चव्हाण या विनाअपघात करणाºया चालकांचा सत्कार करण्यात आला.