नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
By अझहर शेख | Updated: October 10, 2024 01:32 IST2024-10-10T01:31:29+5:302024-10-10T01:32:02+5:30
टाटा ट्रस्टच्या साहाय्याने महापालिका प्रशासनाने नूतनीकरण केलेले हे उद्यान बघून हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे, असे गौरवोद्गार टाटा यांनी राज ठाकरे यांच्याकडे काढले होते.

नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
अझहर शेख, नाशिक : पद्मविभूषण जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची शालिनता आणि साधेपणा सात वर्षांपूर्वी नाशिकने प्रथमच अनुभवला होता. मुंबईकडून येताना नाशिकच्या वेशीवर असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानात (बॉटनिकल गार्डन) टाटा यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत ४५ मिनिटांहून जास्त वेळ घालवला होता. त्यावेळी ते नाशिक पुण्यभूमीत पहिल्यांदाच आले होते. टाटा ट्रस्टच्या साहाय्याने महापालिका प्रशासनाने नूतनीकरण केलेले हे उद्यान बघून हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे, असे गौरवोद्गार त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे काढले होते.
नाशिक नगरपालिकेत मनसेची सत्ता असताना वनविभागाच्या ताब्यात असलेले नेहरू वनोद्यानाचा विकास ठाकरे यांनी करण्याचा संकल्प सोडला होता. त्यानंतर वनविकास महामंडळाकडे वनोद्यान हस्तांतरण करण्यात येऊन वन मंत्रालयाने नूतनीकरणाला ग्रीन सिग्नल दिला होता. यासाठी महापालिका प्रशासनाला टाटा ट्रस्टकडून आर्थिक सहकार्य करण्यात आले होते. आजदेखील प्रवेशद्वारावर टाटा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला फलक येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.
३० जानेवारी २०१७ साली चार्टड विमानाने मुंबईहून रतन टाटा या वनोद्यानाचे लोकार्पण करण्यासाठी पहिल्यांदा नाशिकला आले होते. सोमवारी सकाळी नऊ नाशिकला पोहोचल्यानंतर राज ठाकरे यांनी ओझर विमानतळावर त्यांचे स्वागत केले होते. तेथून ते त्यांच्यासोबत मुंबई-आग्रा महामार्गावरील त्रिरश्मी लेणी (बौद्ध लेणी) डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वनोद्यानात आले. फुलपाखराच्या आकाराचे आकर्षक असे भव्य प्रवेशद्वार बघून टाटा प्रचंड आनंदी झाले होते. इकोफ्रेंडली कारमधून त्यांनी ठाकरे यांच्यासोबत संपूर्ण वनोद्यानात फेरफटका लगावला होता.
यावेळी त्यांनी उद्यानाची व येथील वृक्षराजीची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. त्यावेळी टाटा म्हणाले होते, हे गार्डन व येथील निसर्गाने मला प्रभावित केले. हा इनोव्हेटिव्ह प्रकल्प असून अशा चांगल्या प्रकल्पांची भारताच्या व महाराष्ट्राच्या शहरांना गरज आहे. ही त्यांची नाशिक भेट पहिली आणि अखेरची ठरली. नाशिककरांनी त्यांना बघण्यासाठी यावेळी वनोद्यानात प्रचंड गर्दी केली होती. त्यांच्या या भेटीने एका जगप्रसिद्ध उद्योगपतीचा साधेपणा हा नाशिककरांनी बघितला अन् तो अविस्मरणीय असाच ठरला.