दिल्ली फिल्म फेस्टिव्हलमध्ये नाशिकचा ‘कावळा’
By Admin | Updated: October 25, 2016 01:34 IST2016-10-25T01:34:07+5:302016-10-25T01:34:30+5:30
दिल्ली फिल्म फेस्टिव्हलमध्ये नाशिकचा ‘कावळा’

दिल्ली फिल्म फेस्टिव्हलमध्ये नाशिकचा ‘कावळा’
नाशिक : नाशिकचे दिग्दर्शक व अभिनेता निवास मोरे यांनी नाशिक शहरातीलच कलावंतांना घेऊन तयार केलेल्या ‘कावळा’ या चित्रपटाची दिल्ली इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. कर्मकांडावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने आतापर्यंत अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये वेगळेपणाची चुणूक दाखविली आहे.
दिग्दर्शक व अभिनेता निवास मोरे यांनी दशक्रिया विधी, पिंडदान आदि कर्मकांडावर आधारित ‘कावळा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संपूर्ण चित्रपट नाशिकमध्येच नाशिकच्या कलावंतांना घेऊन तयार करण्यात आला असून, त्याची तांत्रिक जडणघडणही नाशिकमधीलच तंत्रज्ञ-कलावंतांनी केलेली आहे. या चित्रपटात निवास मोरे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
नाशिक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबरोबरच अन्य महोत्सवातही ‘कावळा’चे प्रदर्शन करण्यात आले असून, त्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळालेली आहे. आता दिल्ली येथे दि. ३ ते ९ डिसेंबर २०१६ या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपटात ‘कावळा’ला स्थान मिळाले आहे. तसे पत्र मोरे यांना फेस्टिव्हल आयोजकांनी पाठविले आहे.