नाशिककरांच्या पसंतीचे ‘सोमेश्वर’चे पर्यटन धोक्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:18 IST2018-08-22T23:58:31+5:302018-08-23T00:18:30+5:30

शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर गंगापूर गावाच्या शिवारात असलेल्या बालाजी मंदिरालगत सोमेश्वर धबधबा सध्या खळाळून वाहत आहे. नाशिककरांच्या पसंतीचे जवळचे ‘डेस्टिनेशन’ असलेला सोमेश्वर धबधब्याचा परिसर वर्षानुवर्षांपासून असुरक्षितच राहिला आहे.

 Nashikkar's favorite 'Someshwar' threatens tourism | नाशिककरांच्या पसंतीचे ‘सोमेश्वर’चे पर्यटन धोक्याचे

नाशिककरांच्या पसंतीचे ‘सोमेश्वर’चे पर्यटन धोक्याचे

नाशिक : शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर गंगापूर गावाच्या शिवारात असलेल्या बालाजी मंदिरालगत सोमेश्वर धबधबा सध्या खळाळून वाहत आहे. नाशिककरांच्या पसंतीचे जवळचे ‘डेस्टिनेशन’ असलेला सोमेश्वर धबधब्याचा परिसर वर्षानुवर्षांपासून असुरक्षितच राहिला आहे. धबधब्याभोवती संरक्षक कुंपण उभारण्याची गरज आहे. फोटोसेशनसाठी पर्यटक धबधब्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.  सोमेश्वर धबधब्याच्या परिसरात असलेल्या गोदापात्रातील खडकांवर उभे राहून पर्यटक फोटो काढताना दिसतात. कारण पायवाटेपासून थेट गोदापात्रात जाता येते. येथे कु ठल्याही प्रकारचे संरक्षण कुंपण उभारण्यात महापालिकेला यश आलेले नाही. सोमेश्वर धबधब्याच्या परिसरात विकासकामांची खरी गरज आहे, तरच या पर्यटनस्थळाचा नावलौकिक वाढेल.  या धबधब्याच्या आवारात बालाजी मंदिराचा परिसर वगळता महापालिकेचे स्वच्छतागृहही उपलब्ध नाही. त्यामुळे आलेल्या पर्यटकांची मोठी कुचंबणा होते. याचा सर्वाधिक त्रास महिलावर्गाला होतो. येथील जवळच असलेल्या गोदावरी परिचय उद्यानात अद्ययावत व पाण्याच्या मुबलक व्यवस्थेसह प्रसाधनगृह उभारण्याची मागणी होत आहे.
‘नो-सेल्फी’ सूचना फलकांचा अभाव
सोमेश्वर धबधबा परिसर धोकादायक बनत चालला आहे. येथील हॉटेलच्या मागील बाजूने पर्यटक उंचीवरून खडकावर उभे राहत सेल्फीची हौस भागवितात. यावेळी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उंचीवरून तोल गेल्यास किंवा पाय घसरल्यास थेट नदीपात्रात कोसळण्याचा धोका संभवतो. यामुळे पर्यटकांनी अतिउत्साह व बेभानपणा टाळणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वतीने गोदापात्राच्या परिसरात ‘नो सेल्फी’चे सूचनाफलक लावले आहेत; मात्र दूधसागर धबधब्याच्या परिसरात कोठेही ‘नो-सेल्फी’चे सूचनाफलक नजरेस पडत नाहीत.

Web Title:  Nashikkar's favorite 'Someshwar' threatens tourism