नाशिककरांना डेंग्यूचा डंख, पंधरा दिवसांत ६२ जणांना लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:16 IST2019-08-17T01:15:59+5:302019-08-17T01:16:30+5:30
शहरात आलेल्या महापुरानंतर अपेक्षेप्रमाणेच रोगराईने डोके वर काढले असून, आॅगस्टच्या पंधरा दिवसांतच तब्बल ६२ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत, तर १७२ संशयित रुग्ण आढळले असून, त्यामुळे महापालिकेचे धाबे दणाणले आहे.

नाशिककरांना डेंग्यूचा डंख, पंधरा दिवसांत ६२ जणांना लागण
नाशिक : शहरात आलेल्या महापुरानंतर अपेक्षेप्रमाणेच रोगराईने डोके वर काढले असून, आॅगस्टच्या पंधरा दिवसांतच तब्बल ६२ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत, तर १७२ संशयित रुग्ण आढळले असून, त्यामुळे महापालिकेचे धाबे दणाणले आहे.
नाशिकमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूचे रुग्ण कमी असले तरी ही संख्या आता आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. गेल्या जुलै महिन्यात शहरात डेंग्यूचे ४८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर जुलैअखेरीस संततधार पाऊस झाला, तर ४ आॅगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला महापूर आला. पूर ओसरतानाच आता रोगराईचे कडवे आव्हान असेल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यादृष्टीने महापालिकेत महापौर रंजना भानसी यांनी बैठकदेखील घेतली होती. परंतु उपाययोजना करूनही डेंग्यूचे डास वाढले असून, रोगराई सुरू झाली आहे. आॅगस्ट महिन्याच्या पंधरवाड्यात ६२ डेंग्यू पॉझिटिव्ह असलेले रुग्ण आढळले असून, १७२ संशयित रुग्ण आहेत. जानेवारीपासून आत्तापर्यंत १२२ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. सुदैवाने डेंग्यूमुळे कोणाचा बळी गेलेला नाही.
मनपाकडून आताही घरभेटी सुरू असून, पेस्ट कंट्रोलचे काम वाढविण्यात आले आहे. ज्या भागातून डास वाढल्याची तक्रार येते त्याठिकाणी पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांचे पथकच हजर होत आहेत.
स्वाइन फ्लूचेदेखील आॅगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पाच रुग्ण आढळले आहेत. या रोगाच्या संसर्गाने जानेवारीपासून आत्तापर्यंत १६३ जणांना लागण झाल असून, दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता खºया अर्थाने महापालिकेसमोर आव्हान उभे ठाकले आहे.