जमावाच्या मारहाणीनंतर सराईत गुन्हेगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:03 IST2017-08-12T22:54:32+5:302017-08-12T23:03:08+5:30

जमावाच्या मारहाणीनंतर सराईत गुन्हेगाराचा मृत्यू
नाशिक : पंचवटी अमरधामजवळील टाळकुटेश्वर घाटाजवळ महिलेची छेड काढल्यामुळे नागरिकांनी दिलेला चोप व अतिमद्यपान यामुळे पंचवटीतील सराईत गुन्हेगार मोहन वसंत गवळी ऊर्फ मँगो काळ्या (वय २८, रा. गौरी पटांगण, गंगाघाट) याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़११) मध्यरात्री घडली़ गवळीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याच्या मृत्यूच्या कारणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मॅँगो काळ्या याने शुक्रवारी सायंकाळी अतिमद्यसेवन केले होते़ अमरधामजवळील टाळकुटेश्वर घाट परिसरात त्याने एका महिलेची छेड केल्याने तेथील नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला़ यामध्ये मुक्का मार लागल्याने एका जागेवर पडलेल्या मँगो काळ्याबाबत काही नागरिकांनी १०८ अॅम्ब्युलन्सला फोन करून माहिती दिली़ त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र अतिमद्यसेवन केल्याने होत असलेल्या उलट्यांमुळे मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला़
जिल्हा रुग्णालयात शनिवारी मँगो काळ्याचे शवविच्छेदन करण्यात आले़ त्यामध्ये शरीराला मुक्का मार लागल्याच्या खुणा असल्या तरी त्याचा उलटीचे कण श्वासनलिकेत अडकल्याने श्वास कोंडून मृत्यू झाल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केला आहे़ दरम्यान, व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, प्रयोगशाळेतील अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे़ दरम्यान, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सर्व शक्यता तपासण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दिली़