Nashik Zilla Parishad: नाशिक जिल्हा परिषदेमध्ये विभागप्रमुखाकडून लैंगिक छळ होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. विभागप्रमुखाकडून जिल्हाभरातील विविध विभागातील ३० हून अधिक महिलांवर जाळे फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. पुराव्यांसह तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणांची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर आता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्या विभागप्रमुखाला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखाने अधिकाराचा गैरवापर करत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आलं. अधिकाऱ्याच्या पदाच्या दबावामुळे संबंधित महिला पुढे येऊन तक्रार करण्यास चाचरत होत्या. मात्र, त्या अधिकाऱ्याबाबतची पहिली तक्रार प्राप्त झाली आणि इतर पीडित महिलांनीदेखील तक्रारी केल्या. पीडित महिलांपैकी काहींचा गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ छळ सुरू होता. या अधिकाऱ्याने विविध पदांवर असताना त्या-त्या कार्यालयातील, कामाशी संबंध असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना कामाचा धाक, काही वेळा आमिष दाखवत जाळ्यात अडकवलं होतं.
जिल्हा परिषदेचा ह अधिकारी एकाचवेळी अनेक महिलांशी संधान साधून होता. तरीदेखील तो अन्य महिला कर्मचाऱ्यांना आमिष दाखवून किंवा कारवाईची भीती दाखवून त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली. पावसाळी अधिवेशनादरम्यान, विधान परिषदेतही हे प्रकरण मांडण्यात आलं. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचे म्हटलं.
"नाशिक जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक व लैंगिक छळ झाल्याच्या गंभीर तक्रारीसंदर्भात सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, तसेच ज्या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार आहे त्याला आजच निलंबित करण्यात येईल," अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत दिली.