राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेत नाशिकला सर्वसाधारण विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:12+5:302021-02-05T05:45:12+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य ऍथलेटिकस असोसिएशनच्या वतीने झालेल्या महाराष्ट्र राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेच्या वरिष्ठ गटामध्ये नाशिकच्या खेळाडूंनी ...

राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेत नाशिकला सर्वसाधारण विजेतेपद
नाशिक : महाराष्ट्र राज्य ऍथलेटिकस असोसिएशनच्या वतीने झालेल्या महाराष्ट्र राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेच्या वरिष्ठ गटामध्ये नाशिकच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवत नाशिकला सर्वसाधारण विजेतेपद मिळवून दिले. नाशिकच्या कोमल जगदाळे, मोनिका आथरे, दिनेश प्रसाद, आदेश कुमार, सुमित गोरे, उपेंद्र बलीयन यांनी पदकाला गवसणी घातली.
पुण्यातील नेताजी सुभाषचंद्र मिलिटरी स्कूल येथे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद क्रॉस कंट्री स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये १६ वर्षे मुले- मुली, १८ वर्षे मुले- मुली, २० वर्षे मुले-मुली आणि खुला गट पुरुष आणि महिला या चार गटांचा समावेश होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या नाशिकच्या खेळाडूंनी वरिष्ठ गटामध्ये पुरुष आणि महिला या दोन्हीही गटांत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. पुरुषामध्ये नाशिकच्या खेळाडूंनी पहिल्या चार क्रमांकावर आपले नाव कोरले तर महिला गटातही नाशिकच्या खेळाडूंनी पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवून या गटातही वर्चस्व प्रस्थापित केले. पुरुष गटात नाशिकच्याच खेळाडूंमध्ये चुरस दिसून आली. त्यामध्ये १० किलोमीटरचे अंतर दिनेश प्रसादने ३३ मिनिटे ४० सेकंदात तर तेवढ्याच वेळेसह फ्रॅक्शन सेकंद अधिक वेळेसह आदेश कुमार दुसऱ्या, नाशिकच्या सुमित गोरेने तिसरा तर उपेंद्र बलियनने चौथा क्रमांक मिळविला. महिलांमध्येही नाशिकच्या आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू मोनिका आथरे आणि कोमल जगदाळे या दोघींमध्येच चुरस दिसून आली. त्यात कोमल जगदळेने अंतिम क्षणी वेगाने धाव घेऊन महिला गटात ३८. ०६ अशी वेळ नोंदवित तर मोनिका आथरेने दुसरा क्रमांक निश्चित केला. नागपूरच्या प्राजक्ता गोडबोलेने तिसरा तर सातारच्या रेश्मा कवठेने चौथा क्रमांक मिळविला. राष्ट्रीय स्पर्धेतही महाराष्ट्राचे खेळाडू उत्तम कामगिरी करून तेथेही महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळवून देतील, असा विश्वास नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशनचे चेअरमन आणि राज्य असोसिएशनचे पदाधिकारी हेमंत पांडे यांनी व्यक्त केला.
इन्फो.............
नाशिकच्या धावपटूंच्या या दमदार कामगिरीमुळे नाशिक जिल्ह्याला या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे विविध गटांसाठी महाराष्ट्राच्या संघांची निवड करण्यात आली. यापुढील राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धा १९ फेब्रुवारीला चंदीगड येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेले खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.