Nashik: नाशिकमधील गोदावरी नदीच्या पात्रात जलस्तर अचानक वाढला, एक रिक्षा, एक कार नदीत बुडाल्याची भीती
By अझहर शेख | Updated: August 7, 2022 20:29 IST2022-08-07T20:19:01+5:302022-08-07T20:29:06+5:30
Godavari River Flood: नाशिक शहर आणि परिसरात आज पावसाचा जोर कमी असला तरी पंचवटी, म्हसरूळ, ओझर, आडगाव य उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातून येणारी गोदावरीची उपनदी वरुणा (वाघाडी) पूर आला.

Nashik: नाशिकमधील गोदावरी नदीच्या पात्रात जलस्तर अचानक वाढला, एक रिक्षा, एक कार नदीत बुडाल्याची भीती
- अझर शेख
नाशिक- नाशिक शहर आणि परिसरात आज पावसाचा जोर कमी असला तरी पंचवटी, म्हसरूळ, ओझर, आडगाव य उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातून येणारी गोदावरीची उपनदी वरुणा (वाघाडी) पूर आला. पुराचे पाणी गाडगे महाराज पुलाखाली वेगाने आले. यामुळे नदीपात्रात उभ्या असलेल्या काही वाहनांपैकी दोन रिक्षा एक कार, पाण्यात वाहून गेली. दरम्यान, नागरिकांनी आणि स्थानिक जीवरक्षक दलांनी पाण्यात प्रवेश करून पाण्यात वाहून जाणारी एक रिक्षा बाहेर काढली. मात्र एक रिक्षा आणि कार गाडगे महाराज पुलाखाली गोदावरी नदीपात्रात बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
तसेच येथील नारोशंकर मंदिराच्या शेजारी नदीपात्रात असलेल्या गोपालदास समाधी मंदिराला लागून एक रिक्षा पाण्यात अडकून पडली आहे. पुरात सापडलेल्या एका रिक्षामध्ये प्रवासी होते. अचानक पाणी वाढल्याने त्यांनी बाहेर उड्या मारल्या. स्थानिकांनी आणि जीवरक्षक दलांच्या जवानांनी त्यांना वाचवल्याने मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, गोदावरीची उपनदी असलेल्या वाघाडीला अशा प्रकारे अचानक पूर येण्याची ही गेल्या काही वर्षांमधील पहिलीच वेळ आहे. नाशिकच्या मुख्य शहरात आज कमी पाऊस असला तरी गोदावरीचे पाणलोट क्षेत्र असलेल्या भागापैकी नाशिकच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. हेच पाणी वाघाडी नदीमधून वाहत येत गोदावरीला मिळाले. त्यामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली.