त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 18:58 IST2025-09-20T18:58:05+5:302025-09-20T18:58:40+5:30
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर हल्ला करण्यात आला

त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर गुंडांकडून झालेला अमानुष हल्ला हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार आहे. जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य करून करण्यात आलेली ही मारहाण म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा थेट हल्ला आहे. सरकारने या हल्लेखोर गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, "राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली असून राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे असा प्रश्न पडला आहे. राज्यात कोणीही सुरक्षित नाही हे आजच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथे गुंडांनी पत्रकारांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाले असून किरण ताजणे यांना मोठी दुखापत झाली आहे. ही घटना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व माध्यमांच्या सुरक्षिततेवर घाला घालणारी आहे."
"राज्यात पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करणे ही काळाची गरज असून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे ही राज्य सरकार आणि गृहखात्याची जबाबदारी आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत असून सरकारने तातडीने हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था व पत्रकारांवर वाढते हल्ले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निष्क्रियतेचे उदाहरण आहे. फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा हट्ट सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा," असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.