चुकीचे नियोजन, संथगती कारभाराला कंटाळले नाशिककर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:11+5:302021-07-07T04:17:11+5:30
नाशिक - गेल्या पाच वर्षांत स्मार्ट सिटीचा प्रकल्प सुरू झाला आणि वाद झाला नाही, असे एकदाही घडले नाही. ...

चुकीचे नियोजन, संथगती कारभाराला कंटाळले नाशिककर
नाशिक - गेल्या पाच वर्षांत स्मार्ट सिटीचा प्रकल्प सुरू झाला आणि वाद झाला नाही, असे एकदाही घडले नाही. महाकवी कालिदास कलामंदिर नूतनीकरणापासून सुरू झालेल्या वादांची मालिका स्मार्ट रोड, प्रोजेक्ट गोदा आणि अलीकडे वाळू उपशापर्यंत कायम आहे. त्यामुळेच खरे तर नाशिककर कंटाळले आहेत.
महापालिकेने पाच वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यासाठी नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची स्थापना करण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यावेळी महासभेत या समांतर यंत्रणेवरून प्रचंड वादळी चर्चा झाली होती. प्रत्यक्षात कंपनीचा कारभार स्टेक होल्डर असलेल्या नाशिककरांना आणि त्यांचे प्रतिनिधी असलेल्या नगरसेवकांना विश्वासात न घेता सुरू झाला. अभियानात सहभागी होताना अगोदरच कामे निश्चित असल्याने ती कामे करण्याशिवाय गत्यंतर नव्हतेच. मात्र, कामे कशी असावीत आणि त्यांचा दर्जा याविषयी मात्र संचालक मंडळाला फारसा जणू अधिकार नव्हता. महात्मा फुले कलादालन आणि महात्मा फुले कलादालनाचे नूतनीकरण करताना ठेकेदार निश्चित झाल्यानंतर कलावंतांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांना बोलविण्यात आले. नूतनीकरण करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात पडद्यापासून ते ध्वनी यंत्रणेपर्यंत गोंधळ होता. फुले कलादालनाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा दर्शनी कमानी भाग कोसळला होता. हा विषय वादग्रस्त ठरलाच, परंतु स्मार्ट रोडने नाशिककरांची दमछाक केली. अवघ्या एक किलोमीटर रस्त्यासाठी १७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार म्हटल्यानंतर नाशिककर चकित झाले होते. मात्र, रकमेपेक्षाही अडीच-तीन वर्षे एक रस्ता पूर्ण करण्यात कंपनीने वेळ घालवला आणि त्यामुळे सरकारी कर्मचारी, दुकानदार, प्रवासी अशा सर्वांनाच वेठीस धरले. त्यामुळे स्मार्ट सिटी म्हटली की, सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्यात तिडीक जाते. इतकी नकारात्मक भावना तयार झाली आहे.
आताही गावठाण विकासाच्या नावाखाली खाेदून ठेवलेल्या रस्त्यांमुळेच नाशिककर अधिक संतप्त आहेत. गावठाणातील रस्त्यांची उंची कमी केल्याने गावात पुन्हा पुराचा धोका वाढणार आहे. त्यामुळे अभियानात गावठाणातील रस्ते होणार असताना देखील त्याला विरोध होऊन हे काम थांबविण्याची मागणी होत आहे.
इन्फो...
हे ठरले वादग्रस्त प्रकल्प...
- स्मार्ट रोड - रोड क्वालिटीवरून वाद, रुंदीकरण न करता काम पूर्ण, ठेकेदाराचा दंड माफ
- नेहरू उद्यान - नावालाच नूतनीकरण- पण कोट्यवधींचा खर्च. मुलांना उपयोग नाही
- प्रोजेक्ट गोदा - गोदापात्रात भिंत बांधण्यावरून पर्यावरणप्रेमींचा आक्षेप
- तळ काँक्रिटीकरण - गांधी तलाव, रामकुंडातील तळाचे काँक्रिटीकरण काढण्यास आक्षेप
- गाळ काढणे - गोदापात्रातून गाळ काढण्याऐवजी वाळूचा उपसा
- स्काडा मीटर्स - ज्यादा दराच्या निविदांमुळे प्रस्ताव मागे