नाशकात महापालिकेकडून ७० थकबाकीदारांच्या मिळकती जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 18:58 IST2018-03-15T18:58:24+5:302018-03-15T18:58:24+5:30
धडक कारवाई : रकमेचा भरणा न केल्यास मालमत्तांची विक्री
नाशकात महापालिकेकडून ७० थकबाकीदारांच्या मिळकती जप्त
नाशिक - महापालिकेची लाखो रुपयांची घरपट्टी थकविणाऱ्या मिळकतधारकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून आतापर्यंत ७० बड्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात, शहरातील उद्योगांसह रुग्णालयांचाही समावेश आहे. २१ दिवसांत संबंधित थकबाकीदारांनी रकमेचा भरणा न केल्यास मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री केली जाणार असल्याची माहिती कर विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.
महापालिकेने मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर घरपट्टी थकविणा-या मिळकतधारकांविरुद्ध मोहीम आरंभली आहे. त्यात प्रामुख्याने, लाखो रुपयांची घरपट्टी थकविणा-यांकडे मोर्चा वळविण्यात आला आहे. आतापर्यंत सहाही विभागमिळून ७० मिळकतींवर जप्तीची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे. त्याबाबतची माहिती देताना दोरकुळकर यांनी सांगितले, नाशिकरोड विभागातील सुजाता बिर्ला हॉस्पिटल (१० लाख ३८ हजार), ब्ल्यू पोर्ट प्रा. लिमिटेड (४ लाख), सिडको विभागातील दातार स्विचगिअर (३ लाख ६१ हजार), डॉ. कांतीलाल धाडीवाल (५ लाख २५ हजार), स्वरुप स्टिल (८ लाख ४७ हजार), सागर मिल (४ लाख ६ हजार), सातपूर विभागातील शिवम टॉकीज (२ लाख ६६ हजार), व्हिनस पिस्टाल (४ लाख ८ हजार), एशियन इलेक्ट्रॉनिक्स (१७ लाख ९२ हजार), शेल इंडिया मार्केटिंग (२ लाख ४९ हजार), ज्योती उद्योग (६लाख ३८ हजार), पश्चिम विभागात विशेष लेखापरीक्षक कार्यालय (५ लाख ६४ हजार), श्यामराव केदार असोसिएट (१९ लाख), नाशिक पूर्व विभागातील अरविंद पोतनीस (७ लाख २ हजार), अलय कन्स्ट्रक्शन (१० लाख १७ हजार), सी.बी.लेले-दीक्षित (१८ लाख ७७ हजार), सुभद्रादेवी कपाडिया (१५ लाख ५३ हजार), यशोधन हेल्थकेअर (१० लाख ४५ हजार), निरंजन पेंटस् अॅण्ड हार्डवेअर (२ लाख २९ हजार), डी. पी. पिंगळे अॅण्ड ब्रदर्स (५ लाख ७४ हजार) या बड्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. येत्या २१ दिवसात संबंधितांनी थकबाकीचा भरणा न केल्यास लिलावाद्वारे मालमत्तांची विक्री केली जाणार असल्याचे दोरकुळकर यांनी स्पष्ट केले.