नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 20:05 IST2025-09-04T20:05:43+5:302025-09-04T20:05:57+5:30
नाशिक मंडळाची ही या वर्षातील तिसरी लॉटरी असून यापूर्वी मंडळाने ३७९ सदनिका, १०५ दुकाने आणि ३२ भूखंडांचे वितरण केले आहे.

नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे नाशिक शहर परिसरातील गंगापूर शिवार, देवळाली शिवार, पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, नाशिक शिवार व आगर टाकळी शिवार २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील गृहप्रकल्पांतर्गत ४७८ घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते गुरुवारी वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात करण्यात आला.
नाशिक मंडळाची ही या वर्षातील तिसरी लॉटरी असून यापूर्वी मंडळाने ३७९ सदनिका, १०५ दुकाने आणि ३२ भूखंडांचे वितरण केले आहे. अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे असून, सदनिकांच्या वितरणासाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास म्हाडा कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज नोंदणी आणि अर्ज सादर करता येणार.
३ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती होईल.
४ ऑक्टोबर रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत अनामत रक्कम भरता येईल.
१७ ऑक्टोबरला अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
कुठे किती घरे
देवळाली २२
गंगापूर ५०
पाथर्डी ६४
म्हसरुळ १९६
नाशिक १४
आगर टाकळी १३२