भिवंडीजवळ अपघातात नाशिकचे चौघे ठार
By Admin | Updated: July 17, 2017 01:00 IST2017-07-17T01:00:44+5:302017-07-17T01:00:56+5:30
नाशिक : नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या इनोव्हा मोटारीला भिवंडीजवळ महामार्गावर रविवारी (दि. १६) सकाळी अपघात झाला. इनोव्हाचे टायर फुटल्याने मोटार दुभाजकावर जाऊन आदळून समोरील रस्त्यावर उलटली.

भिवंडीजवळ अपघातात नाशिकचे चौघे ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या इनोव्हा मोटारीला भिवंडीजवळ महामार्गावर रविवारी (दि. १६) सकाळी अपघात झाला. इनोव्हाचे टायर फुटल्याने मोटार दुभाजकावर जाऊन आदळून समोरील रस्त्यावर उलटली. या भीषण अपघातात जुने नाशिकमधील हुड्डा कु टुंबातील दोघा महिलांसह लाखानी कुटुंबातील दांपत्यासह चौघांचा मृत्यू झाला.
याबाबत भिवंडी तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकवरून मुंबईकडे घालेल्या हुड्डा कुटुंबीयांच्या इनोव्हा (एम.एच.१५बीयू ९९४) मोटारीचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोटार दुभाजकावर आदळून मुंबई-नाशिक लेनवरून जाणाऱ्या ट्रकच्या समोर उलटली. ट्रकचालकाच्या सदर प्रकार वेळीच लक्षात आल्यानंतर त्याने तत्काळ ब्रेक लावले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघातामध्ये जुने नाशिकमधील वडाळानाका येथे राहणाऱ्या हुड्डा कुटुंबातील दोन महिलांचा मृतांत समावेश आहे. यामध्ये परवीन नसरुद्दीन हुड्डा (५६), आफसिन मोहिद हुड्डा (२५), गुलशन बहादूर लाखानी (५३, शिंगाडा तलाव), बहादूर मुसाभाई लाखानी (५५, शिंगाडा तलाव) असे मयतांची नावे आहेत. तसेच मोटारचालक मोहिद नसरुद्दीन हुड्डा व नसरुद्दीन सदरुद्दीन हुड्डा हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भिवंडीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अपघातग्रस्त मोटारीच्या मागे या कुटुंबातील दोन मोटारी प्रवास करीत होत्या. पुढील मोटारीचा अपघात झाल्याचे लक्षात येताच तातडीने जखमींना पोलिसांनी पाठीमागून येणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांच्या मोटारीतून रुग्णालयात तत्काळ रवाना केले; मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. दोघांचा जागेवर मृत्यू झाला होता. याबाबत अधिक तपास भिवंडी ग्रामीण पोलीस करीत आहेत.
जुन्या नाशकात शोककळा : अपघातात जुने नाशिकमधील हुड्डा कुटुंबातील दोन महिलांसह लाखानी कुटुंबातील दांपत्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने जुने नाशिक परिसरावर शोककळा पसरली. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अपघात झाला. अपघाताची वार्ता समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हुड्डा हे शहरातील आॅटो स्पेअर्सचे व्यावसायिक आहेत, तर लाखानी हे महात्मानगर येथील बेकर्स बाऊंटीचे संचालक होते. लाखानी दांपत्याच्या मृतदेहांचा दफनविधी दुपारी ४ वाजता, तर हुड्डा कुटुंबातील मृतांचा रात्री ८ वाजता देवळालीगाव येथील खोजा कब्रस्तानात होणार आहे.