नाशिक जिल्ह्यातील खते, कीटकनाशके तपासणीत अधिकारी ‘नापास’; पेठ तालुक्यात पाटी ‘कोरीच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 13:41 IST2017-11-04T13:36:36+5:302017-11-04T13:41:07+5:30

नाशिक जिल्ह्यातील खते, कीटकनाशके तपासणीत अधिकारी ‘नापास’; पेठ तालुक्यात पाटी ‘कोरीच’
नाशिक : कीटकनाशके फवारणीवरून खते व कीटकनाशके विक्रेत्यांनी सरकारविरोधात दंड थोपटले असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मात्र त्यांची ही दुकाने तपासणीची कारवाई या धाकामुळेच ‘आस्ते-कदम’ सुरू ठेवल्याचे चित्र आहे. ३० सप्टेंबर २०१७ अखेर खते, बियाणे व कीटकनाशके विक्री केंद्रांच्या तपासणीचे लक्ष्य सरासरी ५५ ते ५८ टक्केच राहिल्याची धक्कादायक माहिती समोेर आली आहे.
कृषी आयुक्तांची खरीप हंगाम २०१७ आढावा व रब्बी हंगाम २०१७-१८ नियोजनाबाबत बैठक असून, त्यानिमित्ताने कृषी विभागाने केलेल्या संक्षिप्त माहितीतून हे वास्तव उघड झाल्याचे कळते. जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी, मोहीम अधिकारी तसेच जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासह पंचायत समिती कृषी निरीक्षकनिहाय दरमहा खते, बियाणे व कीटकनाशके केंद्रे तपासणीचे लक्ष्य दिलेले असते. त्यानुसार ३० सप्टेंबर २०१७ अखेर खते विक्री केंद्रांचे एकूण २०६८ केंद्रे तपासणीचे लक्ष्य असताना प्रत्यक्षात अवघे ९७६ (४७ टक्के) खते विक्री केंद्रांची तपासणी झाल्याचे समजते. तसेच बियाणे विक्री केंद्रे तपासणीचे १५२४ लक्ष्य असताना प्रत्यक्षात ८८५ (५८ टक्के) बियाणे विक्री केंद्रांचीच तपासणी करण्यात आल्याचे कळते. इतकेच नव्हे तर ज्या कीटकनाशके फवारणीवरून राज्यभर रणकंदन सुरू आहे त्या कीटकनाशके विक्री केंद्र तपासणीचे १४८३ इतके उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ८२० कीटकनाशके विक्री केंद्रांचीच तपासणी करण्यात आल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे.