नाशिक जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’; 'बिपरजॉय' वादळाचा हवामानावर प्रभाव
By अझहर शेख | Updated: June 10, 2023 19:22 IST2023-06-10T19:22:25+5:302023-06-10T19:22:39+5:30
नाशिक शहरासह जिल्ह्यात प्रखर उन्हाच्या झळा अनुभवयास येत असून नागरिकांना उष्णतेचा दाह सोसावा लागत आहे.

नाशिक जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’; 'बिपरजॉय' वादळाचा हवामानावर प्रभाव
नाशिक : शहरासह जिल्ह्यात प्रखर उन्हाच्या झळा अनुभवयास येत असून नागरिकांना उष्णतेचा दाह सोसावा लागत आहे. कमाल तापमानात मागील तीन दिवसांपासून वाढ होत असून उन्हाच्या तीव्रतेचा चटका जाणवत असताना येत्या सोमवारपर्यंत (दि.१२) हवामान खात्याकडून नाशिककरिता ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वीजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह वादळी पाऊस जिल्ह्यात होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नैऋुत्य मान्सूनची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली आहे. पुढील ४८तासांत मान्सून राज्याच्या काही भागात आणखी सरकण्याची श्यक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. दुसरीकडे अरबी समुद्रात उठलेले ‘बिपरजॉय’नावाच्या चक्रीवादळाने हवामानाची स्थिती अधिक बिघडविली आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत गारपीटीचीही श्यक्यता या तीन दिवसांत वर्तविण्यात आली आहे. शनिवारपासून (दि.१०) ते सोमवारपर्यंत (दि.१२) नाशिकमध्ये मान्सुनपुर्व पाऊस पुन्हा एकदा जोरदार वादळी स्वरुपात हजेरी लावण्याची श्यक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे या तीन दिवसांत नाशिककरांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.
जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये वादळी वारा ताशी ३० ते ४० किमी इतक्या वेगाने वाहू शकतो. वीजांचा कडकडाट अन् ढगांच्या गडगडाटासह पाऊस अपेक्षित असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. देवळा, मालेगाव तालुक्यात शुक्रवारी मृगजलधारांचा जोरदार वर्षाव झाला. यावेळी वादळी वाऱ्यामुळे काही भागांतील घरे, शाळांवरी पत्रेही उडाले होते.
चक्रीवादळाचा प्रभाव
नाशिक जिल्ह्याच्या हवामानावरही ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागला आहे. अचानकपणे सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत ऊन कमालीचे तापत आहे. यानंतर वारा सुटतो आणि ढगाळ हवामान तयार होते. शुक्रवारी जिल्ह्यात मालेगाव, देवळा या तालुक्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ असल्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.