Nashik Husband Wife Crime News: पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पत्नीला धमकावून पतीने त्याच्या मित्राच्या मदतीने विवाहितेला चक्क बंगळुरू आणि सोलापूरच्या डान्स बारमध्ये सलग दोन वर्षे नाचण्यास भाग पाडल्याचे उघडकीस आले आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती व मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पत्नीला गुंगीकारक औषध पाजून तिला स्वतःचे गुलाम बनवून ठेवण्याची विकृत मानसिकतेतून हिरावाडी भागातील एका इसमाने स्वतःच्या पत्नीचे मित्राच्या मदतीने अपहरण करत बंगळुरूला नेले. तेथे एका हॉटेलमध्ये मित्रासोबत पत्नीला सोडून पतीने पळ काढला. हॉटेलमधील खोलीत त्याच्या मित्राने विवाहितेचे अश्लील व्हिडीओ काढले. यानंतर विवाहिता शुद्धीवर येताच तिला बंगळुरू येथील एका डान्सबारमध्ये नाचकाम करण्यास त्या व्हिडिओच्या आधारे तिच्या पतीच्या मित्राने धमकावले.
डान्सबारमध्ये नाचली नाही, तर तुझे व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी तिच्या पतीच्या मित्राने दिली. तसेच बळजबरीने तिला शिवीगाळ करत डान्स इच्छा बारमध्ये नसतानाही नाचण्यास भाग पाडल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. ऑगस्ट २०२२ ते जुलै २०२५ या कालावधीत हा सगळा संतापजनक प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी तातडीने महिलेची फिर्याद घेत तिचा पती व मित्राविरुद्ध बीएनएस कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दोघांचा पोलिसांकडून शोध घेतला जात असून, लवकरच त्यांना बेड्या ठोकण्यास यश येईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी सांगितले.
१ लाख रुपये घेत पती फरार
ऑगस्ट २०२२ ते सप्टेंबर २०२३पर्यंत बंगळुरू येथील डान्सबारमध्ये विवाहितेला नाचण्यास तिच्या पतीचा संशयित अक्षय नावाच्या मित्राने भाग पाडले. यानंतर पतीने तेथे येऊन पत्नीला 'तू आता हेच काम करत रहा, मला फक्त पैसे दे..' असे सांगून तिच्या पर्समधून एक लाखाची रोकड घेऊन पती फरार झाला होता.
नोव्हेंबर २०२४ साली अक्षय याने पुन्हा बंगळुरू येथे येऊन पीडितेला तेथून नाशिकला इंदिरानगरला घेऊन आला. तेथे एका हॉटेलमध्ये त्याने चार दिवस ठेवले. तेथून पुणे येथील चाकण मध्ये तो पिडितेला घेऊन गेला.
५० हजार घेऊन पतीचा मित्र फरार
नोव्हेंबर २०२४ साली मुलाला घेऊन पीडिता ठाणे येथे तिच्या आईकडे राहण्यास निघून गेली. तेथे सहा महिने राहिल्यानंतर पुन्हा अक्षय नामक व्यक्तीने फोन करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सोलापूरला येण्यास सांगितले.
भीतीपोटी पीडितेने तेथून सोलापूर गाठले. तेथे त्याने त्याच्या एका इसमासोबत पीडितेची ओळख करून देत जून २०२५सालापर्यंत सोलापूर शहरातील एका डान्सबारमध्ये पीडितेला नाचकाम करण्यास भाग पाडले. त्याने ५० हजार रूपये घेऊन पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.