नाशिक शहरवासीयांची मक्याच्या रोटीतून सुटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 19:24 IST2018-03-15T19:24:49+5:302018-03-15T19:24:49+5:30
केंद्र सरकारने आधारभूत किमतीत चालू वर्षी मका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन खरेदी केलेला मका रेशनमधून एक रुपया किलो दराने विक्री करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत ९६ हजार क्विंटल मका शेतक-यांकडून खरेदी करण्यात आल्याने त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुरवठा

नाशिक शहरवासीयांची मक्याच्या रोटीतून सुटका!
नाशिक : गेल्या चार महिन्यांपासून उत्तर भारतीयांप्रमाणे दर महिन्याला रेशनमधून मिळणाऱ्या मक्याची रोटी खाणा-या शहरवासीयांची एप्रिलपासून सुटका करण्यात आली असून, नाशिकबरोबरच त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांनाही त्यातून वगळण्याचा निर्णय पुरवठा खात्याने घेतला आहे. जिल्ह्यात नोंदणी केलेल्या मक्याची शासनाने अचानक खरेदी बंद केल्यामुळे जितका मका खरेदी केला त्याची गेल्या चार महिन्यांत रेशनमधून विक्री करण्यात आली आहे. आता जेमतेम मका उरलेला असल्यामुळे मे महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्यातच मका बंद करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने आधारभूत किमतीत चालू वर्षी मका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन खरेदी केलेला मका रेशनमधून एक रुपया किलो दराने विक्री करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत ९६ हजार क्विंटल मका शेतक-यांकडून खरेदी करण्यात आल्याने त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुरवठा विभागाने नाशिकसह संपूर्ण जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना दरमहा चार किलोप्रमाणे वाटप सुरू केले. डिसेंबर महिन्यापासून रेशनमधून त्याचे वाटप करण्यात येत असल्याने जिल्हावासीयांना उत्तर भारतीयांप्रमाणे मक्याची रोटी खावी लागली. विशेष म्हणजे जिल्ह्यात आठ तालुके आदिवासी असून, त्यांचे प्रमुख अन्न भात व नागली आहे, त्यांनादेखील शासनाने मका खाण्यास भाग पाडले. दर महिन्याला साधारणत: ३० हजार क्विंटल मक्याचे वाटप शिधापत्रिकाधारकांना करण्यात आले. आता एप्रिल महिन्यात शिल्लक असलेल्या ४९९९ क्विंटल मक्याचे वितरण करण्यात येणार असून, त्यातून मात्र नाशिक शहर, नाशिक तालुका, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, हरसूल या तालुक्यांना वगळण्यात आले आहे तर घोटी, सिन्नर, दिंडोरी, नांदगाव, मनमाड, सटाणा, चांदवड, कळवण, देवळा, येवला, मालेगाव तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना मका खावा लागणार आहे.
जिल्ह्यातील काही भागात रेशनमधून मका देण्यामागे मक्याची वाहतूक हा महत्त्वाचा विषय आहे. पणन महामंडळाकडून येवला, नांदगाव, मालेगाव, बागलाण, देवळा तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मका खरेदी करण्यात आला असून, त्याची साठवणूकही त्या त्या तालुक्यातील गुदामात करण्यात आली आहे. त्यामुळे तेथूनच मक्याची उचल करून नजीकच्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी अतिरिक्त खर्च येणार नाही. या उलट ग्रामीण भागातून मक्याची वाहतूक करून ती नाशिकसह पेठ, सुरगाणा या लांबच्या तालुक्यांमध्ये नेण्यासाठी मोठा वाहतूक खर्च येत आहे. मुळातच एक रुपया किलो दराने विक्री केल्या जाणाºया मक्यासाठी वाहतुकीचा खर्चच गेल्या चार महिन्यांत अधिक झाला.