नामपूरला वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा
By Admin | Updated: July 19, 2014 20:36 IST2014-07-18T23:14:50+5:302014-07-19T20:36:49+5:30
नामपूरला वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा

नामपूरला वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा
द्याने : नामपूर येथील रस्ते वाहनतळ बनल्याने पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
नामपूरच्या शिवमनगर येथे जि. प. शाळा, हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय असून शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस अॅपेरिक्षा, दुचाकी रस्त्यावर आडवे-तिरपे उभे करत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो तर किरकोळ बाचाबाचीचे प्रकार सर्रास घडत असतात. पेट्रोलपंप परिसरात फळ विक्रेते आपल्या हातगाड्या रस्त्यावर उभ्या करतात. नववसाहतीमधून येणाऱ्या महिला, विद्यार्थिनींना याचा त्रास सहन करावा लागत आहे. नथुराम लेन, मोसम हॉस्पिटल परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती या परिसरात मालवाहतूक पिकअप, छोटी मालवाहतूक वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने आजारी रुग्णांना पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेला जागा उपलब्ध नसते. वाहनधारक अरेरावी करतात. अवैध वाहतूक, रोडरोमियो यांच्यावर पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही. नामपूर बसस्थानक परिसरात भाजीपाला व्यावसायिकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने बसेसला आत व बाहेर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. साक्री रस्ता नामपूर बसस्थानक परिसर रस्ता की वाहनतळ, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. विनापरवाना दुचाकी चालविणे, घरफोडी, भुरट्या चोऱ्या, सोनसाखळी चोर, दुचाकीचोर यांचा उपद्रव वाढला असून पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. (वार्ताहर)