नाणेगाव, पळसेला वीज पडून दोन ठार
By Admin | Updated: June 4, 2014 01:24 IST2014-06-04T01:16:46+5:302014-06-04T01:24:59+5:30
नाशिक : तालुक्यातील नाणेगाव व पळसे येथे दोन ठिकाणी वीज पडून एक तरुण व तरुणी जागीच ठार झाल्याची घटना घडली.

नाणेगाव, पळसेला वीज पडून दोन ठार
नाशिक : तालुक्यातील नाणेगाव व पळसे येथे दोन ठिकाणी वीज पडून एक तरुण व तरुणी जागीच ठार झाल्याची घटना घडली. तालुक्यातील बहुतांशी गावांना वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, रात्री उशिरापर्यंत महसूल कर्मचारी पंचनामे करीत होते. तालुक्यातील शिंदे, पळसे, नाणेगाव, हिंगणवेढे येथे झोडपून काढणार्या पावसाने दाणादाण उडविली. त्यातच नाणेगाव येथे समाधान दाते (२८) या तरुणाच्या अंगावर वीज पडली. समाधान हा त्र्यंबक तालुक्यातील तळेगाव त्र्यंबक येथील मूळ राहणारा असून, नाणेगावच्या सोमनाथ शिंदे यांच्याकडे तो पाहुणा म्हणून आला होता. विजेचा कडकडाट होत असल्यामुळे तो बचावासाठी गावातील झाडाखाली थांबला व तेथेच त्याच्यावर वीज कोसळली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अंगावर वीज पडून जागीच ठार झालेली पळसे येथील रूपाली आगळे ही कालच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने आनंदात होती. तिची मोठी बहीण प्रसूत झाल्याने आई-वडील पळसे गावातीलच दवाखान्यात गेलेले होते, तर तिच्या पुढच्या शैक्षणिक प्रवेशासाठी भाऊ सकाळीच पुण्याला रवाना झाला होता. घरात रूपाली एकटीच होती. याच दरम्यान वीज कडकडू लागल्याने अंगणात झाडाखाली बांधलेला बैल सोडण्यासाठी रूपाली घराबाहेर पडली. तिच्या हातात त्यावेळी भ्रमणध्वनी होता. अचानक जोरदार वीज कोसळली व तिने रूपालीला लक्ष्य केले. विजेच्या आवाजाने बैलाने मात्र धूम ठोकली.