मनमाड स्थानकासाठी नांदूरमध्यमेश्वरमधून पाणी?

By Admin | Updated: January 14, 2016 00:01 IST2016-01-13T23:57:16+5:302016-01-14T00:01:54+5:30

रेल्वे प्रशासनाचे पाटबंधारे विभाला पत्र : रेल्वेकडून ८० कोटीची तरतूद; ४८ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव

Nandur water for Manmad station? | मनमाड स्थानकासाठी नांदूरमध्यमेश्वरमधून पाणी?

मनमाड स्थानकासाठी नांदूरमध्यमेश्वरमधून पाणी?

मनोज मालपाणी  नाशिकरोड
मनमाड रेल्वे स्थानकाच्या पाणीटंचाईमुळे निर्माण झालेला गंभीर पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाणी घेण्याची योजना आखली असून तसे पत्र पाटबंधारे विभागाला दिले आहे. यास पाटबंधारे विभागाने होकार दिल्यास रेल्वे प्रशासनाने ८० कोटी रुपये खर्च करून ४८ किलोमीटरची पाइपलाइन टाकण्याचा प्रस्तावदेखील तयार केला आहे. या योजनेला मूर्त स्वरूप लाभल्यास केवळ मनमाड रेल्वे स्थानकाचाच नव्हे तर मनमाड शहराचाही पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. सर्व काही जुळून आल्यास तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याची तयारी रेल्वेने केली आहे.
सद्यस्थितीत पालखेड धरणातून मनमाड रेल्वे स्थानकाला व मनमाड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र पालखेड धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने मनमाड रेल्वे स्थानकाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मनमाड स्थानक हे रेल्वे जंक्शन असल्याने मनमाडमध्येच रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरले जाते. परंतु पाटबंधारे विभागाने गेल्या डिसेंबर महिन्यापासून पाणी कपातीचे धोरण अवलंबिल्यामुळे रेल्वे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
मनमाड रेल्वे स्थानकाच्या २० किलोमीटर अंतरावर पातोडा गाव येथे रेल्वेचे लघु धरण असून तेथे पालखेड धरणातून कॅनॉलद्वारे पाणी येते. रेल्वेच्या धरणामध्ये असलेले पाणी पाइपलाइनद्वारे मनमाड स्थानकातील जलशुद्धिकरण केंद्रात येते. तेथून रेल्वेस्थानक, कारखाना, रेल्वे कॉलनी आदि ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. पालखेड धरणातून अडीच महिन्यांच्या रोटेशननुसार पाणी सोडण्यात येत होते. तर रेल्वेच्या धरणामध्ये अडीच महिने पाणीपुरवठा करता येईल इतकेच पाणी साठवण्याची क्षमता आहे.
पाटबंधारे विभागाने पालखेड धरणातील अत्यल्प पाणी साठ्यामुळे पाणी कपात करून अडीच महिन्यांचे रोटेशन आता चार महिन्यांवर नेऊन ठेवले आहे. रोटेशनमध्ये पालखेड धरणातून ४०० एमसी एफटी (मिलियन क्युबीक फीट) पाणी सोडण्यात येते. त्यापैकी ४ एमसी एफटी पाणी रेल्वेच्या धरणाला मिळते. तर उर्वरित पाणी मनमाड शहर, आजूबाजूच्या ग्रामपंचायत व इतर ठिकाणी जाते; मात्र कॅनॉलद्वारे जाणारे पाणी चोरी तसेच झिरपत असल्याने ५० टक्क्याहून अधिक पाणी वाया जाते. पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याच्या रोटेशनचा कालावधी ४ महिन्यांचा केल्याने मनमाड रेल्वे स्थानकांवर पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवाशांना पाणी देणे ही रेल्वेची जबाबदारी असल्याने रेल्वे प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे. प्रवासी पाण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात करत असल्याने स्थानिक रेल्वे प्रशासन कात्रीत सापडले आहे.
मनमाड रेल्वे स्थानकावरील पाणीटंचाईमुळे पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेसमध्ये नाशिकरोड रेल्वे स्थानकातून पाणी भरण्यात येत आहे. तर मनमाड रेल्वे स्थानकात रेल्वे येण्याच्या पाच मिनिटे अगोदर पाणी सोडले जाते व लगेच पाणीपुरवठा बंद केला जातो. रेल्वे प्रशासनाला पाण्याचा काटकसरीने वापर करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन दिवसांपूर्वी पालखेड धरणातून येवल्यासाठी पाणी सोडण्यात आले. त्यातून मनमाड रेल्वे स्थानकाला ३.३ एमसीएफटी पाणी मिळाल्याने आगामी चार महिने रेल्वे स्थानक, कारखाना कॉलनीत पाणीपुरवठा करता येईल इतका साठा आहे.

Web Title: Nandur water for Manmad station?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.