न्यायडोंगरी : नांदगाव पंचायत समितीचे विद्यमान सभापती विलास आहेर (न्यायडोंगरी) व विरोधी पक्षाचे गटनेते पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे (न्यायडोंगरी) या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला असून, दोघांनीही एकमेकांना पदासाठी अपात्र ठरविण्यात यावे, अशा आशयाचे अपिल एकमेकांविरुद्ध महसूल आयुक्तांच्या न्यायालयात दाखल केले आहे. मोरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत विलास आहेर न्यायडोंगरी येथील शिक्षण संस्थेस कनिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असून, दरमहा २१,७९६ रुपये वेतन घेत असतानाही सभापतिपदाचे मानधन व अन्य भत्तेही घेतात. एकाचवेळी दोन ठिकाणी लाभ घेणारी पदे उपभोगत असल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१चे कलम १६ व ४० अन्वये त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी केली आहे. सभापती विकास अहेर यांनी जि.प. सदस्य अशोक जाधव व पं.स. सदस्य शशिकांत मोरे या दोघांनी आपआपल्या निवडून आलेल्या कार्यक्षेत्राबाहेर प्रवास केल्याचे बिल व भत्ते घेतले असल्याने त्यांनाही अपात्र ठरविण्यात यावे, अशा आशयाचे अपिल दाखल केले आहे. मोरे यांनी केलेल्या तक्रारीची सुनावणी १९ मे रोजी होणार असून, दोघांनीही दोघांना अपात्र ठरविण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नांदगाव पंचायत समितीतील दोघा सदस्यांचे राजकारण पक्षासाठी अपात्र ठरविण्यासाठी आहेर-मोरंेचे परस्पर दावे
By admin | Updated: May 7, 2014 21:17 IST