पालिकेच्या रस्त्यांना ठेकेदार, वाडवडिलांची नावे
By Admin | Updated: September 3, 2015 23:54 IST2015-09-03T23:54:20+5:302015-09-03T23:54:20+5:30
आक्षेप : नियमावलीची कोंबडे यांची मागणी

पालिकेच्या रस्त्यांना ठेकेदार, वाडवडिलांची नावे
नाशिक : शहरातील रस्त्यांना थोर विभूतींची नावे देणे सोडून त्याऐवजी नाशिकमध्ये नेत्यांच्या माता-पित्यांची आणि ठेकेदारांची नावे देण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या रस्त्यांची नावे देण्यास विरोध करून महापालिकेने नामकरणासाठी नियमावली तयार करावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी केली असून, त्यासंदर्भात त्यांनी महासभेत लक्षवेधी दिली आहे.
शहरातील रस्त्यांची कामे ही नागरिकांच्या करातून तयार करण्यात आलेली आहेत. परंतु अनेक ठिकाणी व्यापारी, स्थानिक पुढारी, नवश्रीमंत आपल्या पूर्वजांची नावे सदर रस्त्यांना देऊन त्याचे उद्घाटन सोहळे पार पाडले जात आहेत. इतकेच नव्हे तर तपोवन ते द्वारका दरम्यान ज्या ठेकेदाराने रस्ता बांधला त्या ठेकेदाराचेच नाव देण्यात आले आहे. नाशिकमध्ये नावे शांतरामबापू वावरे यांच्या आणि त्यानंतरच्या कारकीर्दीत देण्यात आली आहेत; त्यामुळे या रस्त्यांची नावे बदलून रस्त्यांना विनोबा भावे, बाबा आमटे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नावे द्यावीत, अशी मागणी कोंबडे यांनी केली
आहे.(प्रतिनिधी)