कुंभनगरीत नमामि गोदावरीची उपेक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:38+5:302021-02-05T05:41:38+5:30
गोदावरीमुळेच नाशिकची कुंभनगरी ओळख आहे. मात्र, दरवेळी कुंभमेळ्यात गोदावरी नदीच्या शुध्दीकरणाविषयी चर्चा झडत असतात. त्र्यंबकेश्वरपासून उगम पावणाऱ्या आणि पाच ...

कुंभनगरीत नमामि गोदावरीची उपेक्षा !
गोदावरीमुळेच नाशिकची कुंभनगरी ओळख आहे. मात्र, दरवेळी कुंभमेळ्यात गोदावरी नदीच्या शुध्दीकरणाविषयी चर्चा झडत असतात.
त्र्यंबकेश्वरपासून उगम पावणाऱ्या आणि पाच राज्यांना समृध्द करीत जाणाऱ्या गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा नाशिकमध्ये तरी ऐरणीवर आहे. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेची आणि नाशिक महापालिकेचीदेखील आर्थिक मर्यादा तसेच विविध शासकीय यंत्रणांची गुंतागूंत बघता गोदावरी नदीसाठी स्वतंत्र प्राधीकरण हवे अशी मागणी जोर धरत आहे. २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर साबरमतीच्या धर्तीवर नाशिकचा विकासदेखील चर्चेत आला होता. प्रत्यक्षात निधीअभावी महापालिकेचे हात बांधले असल्याने हा विषय पुढे गेला नाही. आता महापौर सतीश कुलकर्णी आणि गोदावरी नदीबाबत संवेदनशील असलेल्या आयुक्त कैलास जाधव यांनी हा विषय केंद्र सरकारकडे नेण्याचे ठरवले आणि त्या आधारेच नमामि गंगेची संकल्पना मांडली.
नाशिक शहरातून ६७ नाले जातात. हे नाले खरे तर पावसाळ्यातच प्रवाही होणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र, गटारी आणि सांडपाण्यामुळे हे नाले आठ महिने तर काही वेळा बारमाही वाहत असतात. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी या नाल्यांलगत स्वतंत्र मलवाहिका टाकून सांडपाणी किंवा मलजल थेट मलनिस्सारण केंद्रात नेता येण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर साबरमतीच्या धर्तीवर विकसीत करून गोदाकाठ संरक्षित करण्याचा प्रस्ताव आहेे. त्यासाठी साधारणत: १८०० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षीत आहे. अर्थात, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवालात दर कमी अधिक होऊ शकतात. केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत काही तरी तरतूद होईल अशी अपेक्षा होती. मात्र, त्याबाबत निराशा झाली आहे.
काेट...
नमामि गंगेच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी रिवर आणि सिव्हर वेगळे करावे यासाठी केंद्र शासनाकडे विशेष प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र,त्यासाठी अंदाजपत्रकात तरतुदींची घोषणा झालेली दिसत नाही. केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
- सतीश कुलकर्णी, महापौर