नाईक संस्थेच्या निवडणुकीचे पडघम
By Admin | Updated: May 18, 2014 23:44 IST2014-05-18T23:30:41+5:302014-05-18T23:44:35+5:30
हालचाली सुरू : १९ जुलैला संपणार मुदत ; पंचवार्षिकसाठी निवड मंडळ जाहीर

नाईक संस्थेच्या निवडणुकीचे पडघम
हालचाली सुरू : १९ जुलैला संपणार मुदत ; पंचवार्षिकसाठी निवड मंडळ जाहीर
नाशिक : शहरातील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत येत्या १९ जुलैला संपणार असून, आगामी निवडणुकीसाठी संचालक मंडळाने निवड मंडळ जाहीर केले आहे. निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली, तरी आगामी निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत येत्या दोन महिन्यांत संपणार आहे. संचालक मंडळाच्या मुदतीच्या किमान ४५ दिवस आधी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे बंधनकारक असल्याने येत्या आठवडाभरात निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात येऊन निवड मंडळ जाहीर करण्यात आले आहे. या मंडळात तीन वकिलांचा समावेश असून, मंडळाचे अध्यक्ष म्हणून ॲड. गजेंद्र सानप यांची, तर त्यांच्यासोबत ॲड. जालिंदर तारगे व ॲड. संतोष दरगोडे यांची निवड करण्यात आली आहे. निवड मंडळाकडून येत्या आठवडाभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
मागील पंचवार्षिकमध्ये वाद निर्माण झाला आणि संस्थेला सभासदांचा रोष ओढवून घ्यावा लागला होता. त्याचबरोबर मागील दोन वर्षांच्या वार्षिक सभाही वादग्रस्त कामांमुळे चांगल्याच गाजल्या. या दोन्हीही सभांमध्ये विद्यमान संचालकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. विविध मुद्द्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या नाईक संस्थेच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम येत्या काही दिवसांतच जाहीर होणार आहे.
विद्यमान संचालक मंडळ
नाईक शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळावर दोघा पॅनलचे मिळून एकूण २९ उमेदवार आहेत. यापैकी तुकाराम दिघोळे (अध्यक्ष) यांच्या पॅनलचे २६, तर कोंडाजीमामा आव्हाड (सरचिटणीस) यांच्यासह त्यांच्या पॅनलचे तीन उमेदवार आहेत. दिघोळे यांच्या पॅनलमध्ये अशोक धात्रक (उपाध्यक्ष), ॲड. पी. आर. गिते (सहचिटणीस), चार विश्वस्त आणि १९ संचालकांचा समावेश असून, आव्हाड यांच्या पॅनलमध्ये दोघा विश्वस्तांचा समावेश आहे.