नाशिक : शिंगाडा तलाव येथील कार डेकोर व्यावसायिक निखील ऊर्फ निकु दर्यानी यांच्याकडे खूप रोकड असते. त्यांचे मोठे व्यवहार सुरू असतात, अशाप्रकारची माहिती पुरवून दुकानातील कामगारांनी त्यांची अन्य तिघांना 'टीप' दिली होती. यावरून अपहरणाचा कट शिजला अन् शुक्रवारी काठे गल्ली येथील सिग्नलवरून त्यांच्याच कारमध्ये दोघांनी बसून डोक्याला बंदूक लावत शहराबाहेर घेऊन जात अपहरण केल्याचा उलगडा पोलिसांच्या तपासातून झाला आहे. संशयित अल्फरान अश्पाक शेख (२५, रा. चौक मंडई), अहमद रहिम शेख (२५, रा. वडाळा) अशी दोघा अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कार व्यावसायिकाची 'टीप' देणारे व त्यांचे अपहरण करणारे आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात आले. निखील प्रदीप दर्यानी (२७, रा. ओझोन अपार्टमेंट, टाकळीरोड) हे कार डेकोरचा व्यवसायासह जमीन खरेदी-विक्री तसेच काही हॉटेल व्यवसायातही त्यांची भागीदारी आहेत. ते शुक्रवारी दुपारी त्यांच्या कारमधून (एम.एच१६ सीई २०२०) पुणे महामार्गाकडे प्रवास करत होते. काठे गल्ली सिग्नलवर ते थांबले असता तेथे दोघे अनोळखी इसम आले. त्यांनी त्यांच्या कारची काच वाजवून चर्चा करायची आहे, असे सांगितले. त्यांनी त्या दोघांना कारमध्ये बसविले अन् दर्यानी यांनी येथे मोठी चूक केली. त्या दोघा अपहरणकर्त्यांनी डाव साधला अन् जवळ असलेली पिस्तूल काढून त्यांच्या डोक्याला लावून अपहरण केले.
वाचा >रुग्णाला काय अमृत पाजले का? शिंदेंच्या आमदाराने ६ लाखांच्या बिलावरून डॉक्टरला झापले
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. यामध्ये उपनिरीक्षक सुदाम सांगळे, हवालदार महेश साळुंके, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, राम बर्डे, मुख्तार शेख, किरण शिरसाठ, विलास चारोस्कर, मनिषा सरोदे आदींनी दिवस-रात्र एक करत सीसीटीव्ही फुटेज तपासत तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने या अपहरणाचा पर्दाफाश केला. दोन ठिकाणी सापळा रचून चौघांना शिताफीने बेड्या ठोकल्या. समतानगरातून दर्यानी हे गुरुवारी रात्री घरी जात असताना त्यांच्या अपहरणाचा डाव आखण्यात आला होता.
एका फुटेजवरून शिक्कामोर्तब
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना व्यावसायिकाचे अपहरण झाल्याची माहिती फोनवरून मिळाली, त्यानंतर रात्री उशिरा फिर्यादी अपहृत दर्यानी यांनी स्वतःची सुटका करून घेत कसेबसे पोलिस ठाणे गाठले होते. गुन्हा दाखल करून घेण्यात आला आणि कर्णिक यांनी तातडीने गुन्हे शाखा युनिट-१चे पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना याबाबत तपासाची सूचना दिली.
सुरुवातीला बनाव वाटत असल्याने पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर दोन ठिकाणी फुटेजमध्ये दर्यानी यांची कार व ते पळतानाचे चित्र दिसून आले आणि अपहरणावर शिक्कामोर्तब झाला.
... असे केले अपहरण
काठे गल्ली सिग्नलवर एकजण दर्यानी यांच्या कारजवळ आला. 'निकुभाई, आपसे सुनीलभाई को बात करनी है...' असे म्हणून त्यांच्या कारमध्ये बसला. त्याने दर्यानी यांच्या डोक्याला बंदूक लावली. तोपर्यंत त्यांचा एक साथीदाराने त्यांच्या कारमागे दुसरी कार आणून दर्यानी यांची कार शहरातून बाहेर घेऊन जाण्यास भाग पाडले. गरवारे चौकाजवळ त्यांनी कार बदलली आणि दर्यानी यांची कार येथील रस्त्याच्या बाजूला उभी करत तिघांनी दर्यानी यांना घेऊन खत प्रकल्पाच्या बाजूने गौळाणेरोडने पलायन केले होते.
फरार आरोपीवर १९, तर अटकेतील एकावर ७ गुन्हे
संशयित आरोपी अपहरणकर्ते मोहम्मद अन्वर सय्यद (३०, रा. नानावली) हा सराईत गुन्हेगार आहेत. याच्याविरुद्ध यापूर्वी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. संशयित सादिक सय्यद (३९, रा. लेखानगर) याने रिक्षामधून येत पंधरा लाखांची रोकड स्वीकारली. या दोघांचा म्होरक्या फरार पाहिजे आरोपीदेखील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर १९ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दरोडा, जबरी लूट, हाणामारीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.