पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीतर्फे माझी वसुंधरा अभियानाची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 16:52 IST2021-01-01T16:51:38+5:302021-01-01T16:52:22+5:30
पिंपळगाव बसवंत : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, तसेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने नवीन वर्षाचे औचित्य साधून ग्रामपंचायत भवन, अग्निशमन विभाग, पाणी विभाग, स्वच्छता विभाग, पोलीस प्रशासन कार्यालय, प्राथमिक रुग्णालय आदी कार्यालयांत माझी वसुंधरा अभियानाची शपथ घेण्यात आली.

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीतर्फे माझी वसुंधरा अभियानाची शपथ
या शपथेत स्वच्छ, सुंदर, सुजलाम्, सुफलाम् भारत घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, विविध प्रकारची वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करू. हरित भारताचे स्वप्न पूर्ण करेन, धूरमुक्त भारत होण्यासाठी विविध संकल्पना समोर आणीन व त्याचा वापर करेन, घर, गाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः कृती करून जनजागृती करेन, पाण्याचा कमीतकमी वापर करून पाण्याच्या बचतीचा धडा सर्वासमोर ठेवीन, जमिनीचा स्तर उंचावण्यासाठी प्लास्टीकचा वापर करणार नाही, पृथ्वीच्या संरक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध राहीन, या मुद्द्यांचा अंतर्भाव होता. ही शपथ पिंपळगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना, तसेच नागरिकांना देण्यात आली. यावेळी सरपंच अलका बनकर, उपसरपंच सुहास मोरे, ग्रामपंचायत सदस्य संजय मोरे, गणेश बनकर, सत्यभामा बनकर, अश्विनी खोडे, बापू कडाळे, अल्पेश पारख, सुरेश गायकवाड, छाया पाटील, नंदू गांगुर्डे, अंकुश वारडे, दीपक मोरे, बाळा बनकर, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.